ind vs nz कसोटी खेळाडूंचे आजपासून मुंबईत सराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND VS NZ

IND VS NZ : कसोटी खेळाडूंचे आजपासून मुंबईत सराव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एकीकडे भारताचा वन डे संघ येत्या १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज होत असतानाच कसोटी स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे क्रिकेटपटू उद्यापासून (सोमवार) मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार अकादमीत कसून सराव करणार आहेत. भारतीय संघातील कसोटीपटूंच्या सराव शिबिराबाबत बीसीसीआयच्या सूत्रांकडून रविवारी माहिती देण्यात आली. भारत-न्यूझीलंड यांच्यामध्ये २५ नोव्हेंबरपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून दोन देशांमधील पहिला कसोटी सामना कानपूरला, तर दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून मुंबईला आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा: राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख लक्ष्मण होणार; सौरव गांगुली

कानपूर येथे खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर अजिंक्य रहाणेला क्रिकेटचा सराव करायला मिळालेला नाही. भारताच्या टी-२० संघात त्याची निवड करण्यात येत नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपला ठसा उमटवता यावा यासाठी त्याने काही दिवसांपूर्वीच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सरावाला सुरुवात केली आहे.

अजिंक्य रहाणे याच्यासह मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, प्रसिध कृष्णा, उमेश यादव, रिद्धीमान साहा, के. एस. भारत व जयंत यादव यांचाही उद्यापासून सुरू होणाऱ्या सराव शिबिरात सहभाग असणार आहे.

विशेष सरावाचे आयोजन - बीसीसीआय

कसोटी क्रिकेट खेळून बराच कालावधी उलटून गेला. आयपीएलनंतर टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात आले. पण या कालावधीत कसोटी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना सराव करण्याची संधीच मिळाली नाही. कसोटी स्पेशालिस्ट यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी अव्वल दर्जाचा सराव करता यावा यासाठी मुंबईत चार दिवसांच्या सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून रविवारी देण्यात आली.

हेही वाचा: भारतीय संघाच्या पराभवाचे विश्लेषण; BCCI च्या बैठकीत चर्चा

बीकेसीतील सुविधांचा सरावासाठी वापर

बीसीसीआयकडून आम्हाला सराव शिबिराचे आयोजन करण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही या चार दिवसीय सराव शिबिरासाठी बीकेसी येथील शरद पवार अकादमीची निवड केली. आता येथे उद्यापासून चार दिवस भारतीय संघातील कसोटीपटूंचे सराव शिबिर रंगणार असून येथील सुविधांचा सरावासाठी वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.

loading image
go to top