IND VS NZ | न्यूझीलंडसाठीही फिरकीचे जाळे असणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs nz

IND VS NZ | न्यूझीलंडसाठीही फिरकीचे जाळे असणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कानपूर : मायदेशात प्रतिस्पर्धी संघासाठी फिरकीचे जाळे विणणारा भारतीय क्रिकेट संघ उद्यापासून कानपूर येथे खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटीत तोच सापळा रचण्याची दाट शक्यता आहे. या कसोटीत मुंबईकर श्रेयस अय्यरचे कसोटी पदार्पणही निश्‍चित झाले आहे. याचबरोबर गेल्या काही कसोटी डावांमध्ये सुमार फॉर्ममधून जाणारा टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याप्रसंगी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणारा भारतीय संघ केन विल्यमसनच्या वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडचा कसा सामना करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

कानपूरच्या ऐतिहासिक ग्रीन पार्क मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. पाहुण्या संघासमोर भारतीय फिरकीला तोंड द्यायचे मोठे आव्हान आहे. सततच्या खेळाने भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना दुखापतींची भीती वाढत आहे. ज्या के एल राहुलला संघातील दोन सलामीचे फलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामने अचानक खेळायला मिळाले त्याच के एल राहुलला आता दुखापत झाल्याने श्रेयस अय्यरला कसोटी पदार्पण करायची संधी मिळणार आहे. तसेच फॉर्मशी झगडत असलेल्या अजिंक्य रहाणेलाही विराट कोहलीच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करायला मिळताना फलंदाज म्हणून जोरदार पुनरागमन करायची मोठी संधी आहे. सहा प्रमुख खेळाडूंविना भारतीय संघ मैदानात उतरणार आहे, त्याचा काही फायदा विल्यमसनचा संघ उचलतो का, हे बघायचे आहे.

हेही वाचा: सूर्यकुमारची २४ स्थानांची 'गरूडझेप'; दमदार कामगिरीचं मिळालं फळ

रोहित शर्माने घेतलेली विश्रांती आणि राहुलला झालेल्या दुखापतीमुळे शुभमन गिल आणि मयांक अगरवाल सलामीला यायची शक्यता आहे. मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणेला श्रेयस अय्यरची साथ लाभेल.. महंमद सिराजच्या हाताची दुखापत बरी झाली तर तो खेळेल नाहीतर ईशांत शर्मा- उमेश यादवच्या जोडीला अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाची ताकद लाभेल. न्यूझीलंड संघात अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट नसला तरी जास्त काही अडणार नाही. कारण नील वॅगनरची संघातील हजेरी उणीव भरून काढेल. फक्त नील वॅगनर करत असलेली आखूड टप्प्याची गोलंदाजी ग्रीन पार्कच्या संथ आणि कमी उसळीच्या खेळपट्टीवर किती परिणाम साधेल शंका आहे. न्यूझीलंड संघाचे फिरकी गोलंदाजांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागेल.

राहुल द्रविडने मर्यादित षटकांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवून चांगली सुरुवात केली असल्याने कसोटी मालिकेकडूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

ग्रीन पार्क मैदानाचा इतिहास

कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानाला मोठा इतिहास आहे. या मैदानावर पहिल्यांदा १९५२ मध्ये भारत वि. इंग्लंडदरम्यान कसोटी सामना रंगला होता. एकूण २२ कसोटी सामने या मैदानावर खेळले गेले ज्यात फक्त ३ सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली आहे. १२ कसोटी सामने अनिर्णीत राहिले आहेत आणि ७ कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. २००८-०९ आणि २०१६ मध्ये कसोटी सामन्यात भारतीय संघाचे विजय हे प्रचंड मोठ्या फरकाचे होते. गुरुवारी सुरू होणाऱ्या दोनही संघातील बरेच खेळाडू २०१६ मध्ये याच मैदानावर झालेल्या कसोटीत एकमेकांसमोर खेळलेले आहेत.

हेही वाचा: रोहित-विराटच्या अनुपस्थितीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI

या खेळपट्टीत दडलंय काय…

भारत-न्यूझीलंड यांच्यामधील पहिला कसोटी सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियममध्ये रंगणार आहे. भारतातील इतर राज्यांतील स्टेडियममधील खेळपट्ट्यांप्रमाणे उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटीची खेळपट्टीही फिरकी गोलंदाजांना पोषकच असणार आहे. याही खेळपट्टीवर हळूवारपणे फिरकी गोलंदाजांचेच वर्चस्व दिसून येईल. तसेच कसोटीच्या पाचही दिवस पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी

  • स्थळ - कानपूर

  • वेळ - सकाळी ९.३० वाजता

  • प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस्‌

loading image
go to top