World Cup 2019 : भारताचा पाकवर 'बाप' विजय

सुनंदन लेले
सोमवार, 17 जून 2019

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वात हायव्होल्टेज सामना समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय संघाने फ्युजच काढून टाकला. एकदमच एकतर्फी विजय मिळवत विश्कवरंड स्पर्धेच्या इतिहासात विजयाची परंपरा कायम ठेवत सातवा विजय मिळवला.

मॅंचेस्टर : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्ययच निर्णायक ठरणार अशी चर्चा असताना रोहित शर्माचे वादळच पाकिस्तानवर धडकले.

त्यापाठोपाठ विराट कोहली आणि सहकारीही पाकिस्तानवर बरसले. मात्र, फलंदाजीचे नंदनवन गोलंदाजीस अनुकूल करण्याच्या पाकिस्तानी गोलंदाजांच्या कुटिल चाली फसल्या. आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना धावांच्या दुष्काळास सामोरे जावे लागले आणि विश्‍वकरंडक स्पर्धेत आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला.
गोलंदाजीची वाढती ताकद भारतीय फलंदाजीचा दबदबा जास्तच वाढवते याचीच प्रचिती आली. एका वर्षापूर्वी महंमद आमीरसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली होती; पण तो इतिहास झाला आहे, हेच वारंवार सिद्ध झाले. भारतीय धावांच्या वर्षावाने खच्ची झालेल्या पाक फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीचा फायदाही घेता आला नाही.

महमंद आमीरने खेळपट्टी खराब करण्याचा प्रयत्न केला; पण त्यापासून रोहित शर्माने प्रेरणा घेतली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये डावाच्या उभारणीस महत्त्व देणाऱ्या रोहित शर्माने प्रतिहल्ला केला. रोहितने भारतीय धावगतीस दिलेली गती कधीही कमी होणार नाही याची काळजी भारतीय फलंदाजांनी घेतली.

भारतीय डाव संपताना आलेल्या पावसामुळे आता आपली फलंदाजी सुरू होणार ही पाकिस्तानची अपेक्षा होती. प्रत्यक्षात भारताचाच डाव सुरू राहिला आणि कदाचित त्यामुळेच पाक फलंदाजांचे लक्ष विचलित झाले. भुवनेश्वर कुमार जखमी झाल्यावर त्यांनी बदली गोलंदाज विजय शंकरला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात सलामीची विकेट गमावली. बाबर आझम आणि फखार झमान यांची शतकी भागीदारी भारतास सतावू लागली होती. मात्र त्यांनी भारतीयांवर पुरेसे दडपण आणले नव्हते. आवश्‍यक धावगती सातत्याने वाढत होती. मात्र दोघांनाही कुलदीप यादवच्या फिरकीने चकवले. झपकन आत आलेल्या चेंडूवर काही समजण्यापूर्वीच बाबर चकला होता. हे समोरून बघणाऱ्या फखारने त्याच टप्प्यात पडलेल्या चेंडूला स्वीप करण्याचा आततायी प्रयत्न केला आणि त्यानंतर पाकच्या फलंदाजांत बाद होण्यासाठी स्पर्धा सुरू झाली.

आपल्या रूपाने भारतास नवा कपिलदेव गवसला हे काही क्रिकेटतज्ज्ञांचे मत जणू योग्य असल्याचे दाखवताना हार्दिक पंड्याने महम्मद हफीझ आणि शोएब मलिकला बाद केले. बदली गोलंदाज विजय शंकरने सर्फराजला चकवल्यावर भारताचा विजय किती धावांनी ही औपचारिकताच शिल्लक राहिली.

संक्षिप्त धावफलक
भारत 50 षटकांत 5 बाद 336 (रोहित शर्मा 140 - 113 चेंडू, 14 चौकार, 3 षटकार, विराट कोहली 77 - 65 चेंडू, 7 चौकार, लोकेश राहुल 57 - 78 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, हार्दिक पंड्या 26, विजय शंकर नाबाद 15, महंमद आमीर 10-1-47-3, हसन अली 9-0-84-1, वहाब रियाझ 10-0-71-1) वि.वि. पाकिस्तान (सुधारित आव्हान 40 षटकांत 302) 6 बाद 212 (फखर झमार 62 - 75 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, बाबर आझम 48 - 57 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, इमाद वसिम नाबाद 46, शादाब खान नाबाद 20, विजय शंकर 5.2-0-22-2, कुलदीप यादव 9-1-32-2, हार्दिक पंड्या 8-0-44-2)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India beat Pakistan 7th times in World Cup 2019