भारतीय हॉकी संघाचा पाकला 'पंच' 

वृत्तसंस्था
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

ढाक्‍यातील या स्पर्धेतील भारत- पाक लढतीकडे अर्थातच सर्वांचे लक्ष होते. भारतीयांनी पाकला प्रतिआक्रमणाची संधी मिळू नये यासाठी आपली मधली फळी जास्त भक्कम केली होती, तसेच बचावाकडेही जास्त लक्ष दिले. पहिल्या दोन सत्रांत पाकची आक्रमणे निष्प्रभ करण्यात गोलरक्षक आकाश चिकटेनेही मोलाची भूमिका बजावली. मात्र, प्रतिआक्रमणात एस. के. उथप्पा, एस. व्ही. सुनील, गुरजांत सिंगने दवडलेल्या संधी भारतास सलत होत्या; पण भारताने विजय निसटू दिला नाही. 

मुंबई : भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानविरुद्धची यशोमालिका सुरू ठेवताना आशिया हॉकी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांवर हुकूमत राखली. अनुभवी सरदार सिंगने केलेल्या चुकीमुळेच पाकला भोपळा फोडता आला. भारताने विनासायास 3-1 असा विजय मिळविला; पण एकतर्फी विजयापासून भारतास वंचित राहावे लागले. 

ढाक्‍यातील या स्पर्धेतील भारत- पाक लढतीकडे अर्थातच सर्वांचे लक्ष होते. भारतीयांनी पाकला प्रतिआक्रमणाची संधी मिळू नये यासाठी आपली मधली फळी जास्त भक्कम केली होती, तसेच बचावाकडेही जास्त लक्ष दिले. पहिल्या दोन सत्रांत पाकची आक्रमणे निष्प्रभ करण्यात गोलरक्षक आकाश चिकटेनेही मोलाची भूमिका बजावली. मात्र, प्रतिआक्रमणात एस. के. उथप्पा, एस. व्ही. सुनील, गुरजांत सिंगने दवडलेल्या संधी भारतास सलत होत्या; पण भारताने विजय निसटू दिला नाही. 

भारताच्या आक्रमणाच्या धडाक्‍याखाली कोलमडलेल्या पाकने या पराभवानंतरही स्पर्धेच्या अव्वल साखळीत प्रवेश केला. चिंगलेनसाना, रमणदीप आणि हरमनप्रीतने प्रत्येकी एक गोल करीत भारताचा विजय साकारला. अली शानने यामुळेच पाकचा एकमेव गोल केला. आता याच दोन संघांत पुन्हा अव्वल साखळीत लढत होईल. भारत, पाकिस्तानप्रमाणेच कोरिया आणि मलेशियाने आगेकूच केली. 

भारताचा जम बसल्यावर प्रामुख्याने वन वे ट्रॅफिकच सुरू होता. भारतीय आक्रमणात अधिक अचूकता, तसेच सफाई असती, तर पाकवर गोलवर्षावच झाला असता. भारताला पाच पेनल्टी कॉर्नरचाही पुरेसा उपयोग करता आला नाही, हेही सलत असेल. त्याचबरोबर एका गोलनंतर पाकने केलेली जोशपूर्ण आक्रमणे, त्या वेळी झालेला भारतीयांचा गोंधळही विजयाचा पुरेसा आनंद देत नव्हता. पाकनेही चार पेनल्टी कॉर्नर मिळवत भारतीय बचाव भेदण्याची आपली ताकद आहे, हे अखेरच्या सत्रात दाखवून दिले. आकाश चिकटेला या विजयाचे श्रेय नक्कीच द्यायला हवे. त्याने पाक आक्रमकांचा चांगला अंदाज घेत झेपावत गोल रोखले. 

भारताने पहिल्या दोन सामन्यांत एक डझन गोल केले होते, तर पाकला जपानविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली होती. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्यामुळे पाकचा स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळ झाला. त्याचबरोबर हॉकी लीगमध्ये भारताने पाकचा 7-1 आणि 6-1 असा धुव्वा उडवला होता. त्या तुलनेत हा विजय सफाईदार नव्हता. 

Web Title: India beat Pakistan in Hockey