पाककडून भारतीय गोलंदाजीची पिसे; 339 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था
रविवार, 18 जून 2017

आझम बाद झाल्यामुळे पाकची धावगती मंदाविण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र हफीझ याने सर्व सूत्रे हाती घेतल्याने पाकने 46 व्या षटकांतच 300 चा टप्पा पार केला. अवघ्या 34 चेंडूंत नाबाद अर्धशतक झळकाविलेल्या हफीझ याने इमाद वसीम (25 धावा, 21 चेंडू) याच्या साथीत पाकची धावगती घसरु न देण्याची खबरदारी घेतली

लंडन - आयसीसी चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज (रविवार) पाकिस्तानी फलंदाजांनी तडाखेबंद फलंदाजीचे प्रदर्शन घडवित भारतासमोर 339 धावांचे पर्वतप्राय आव्हान उभे केले. सलामीवीर फखर जमान याचे तडाखेबंद शतक (114 धावा, 106 चेंडू) हे पाकिस्तानच्या या धावसंख्येमधील प्रमुख वैशिष्ट्य ठरले. जमान याच्यासहच अझर अली (59 धावा,72 चेंडू), बाबर आझम (46 धावा, 52 चेंडू), मोहम्मद हफीझ (57 धावा,37 चेंडू) या इतर पाकिस्तानी फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजीची पिसे काढण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.

जमान व अली यांनी 23 षटकांत 128 धावांची सलामी देत पाकिस्तानच्या डावाची भक्कम पायाभरणी केली. डावाच्या सुरुवातीस नशीबाची साथ लाभलेल्या अली व जमान यांनी सावध खेळ केला. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये भारतीय क्षेत्ररक्षकांचे थेट "थ्रो' करुन यष्टि उडविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत; तर जसप्रित बुमराहच्या गोलंदाजीवर जमान बाद झालेला चेंडू हा नेमका "नो बॉल' ठरला. सावध खेळ करणाऱ्या अली व जमान यांनी हळुहळू धावसंख्या वाढविण्यास सुरुवात केली. भुवनेश्‍वर कुमार (44 धावा,1 बळी) व बुमराह (68 धावा, 0 बळी) या वेगवान भारतीय गोलंदाजांची षटके शांतपणे खेळून काढल्यानंतर गोलंदाजीसाठी आलेले फिरकी गोलंदाज पाक सलामीवीरांचे विशेष लक्ष्य ठरले. विशेषत: फिरकीपटू रवीचंद्रन आश्‍विन (10 षटके, 70 धावा) याचे अपयश डोळ्यांत विशेष भरणारे ठरले. आश्‍विन याच्या 10 षटकांत तब्बल चार चौकार व तीन गगनचुंबी षटकार तडकाविण्यात आले. रवींद्र जडेजा याच्याही 8 षटकांत तब्बल 67 धावा फटकाविण्यात आल्या.

जम बसलेली ही जोडी एका धावेचा अंदाज न आल्यामुळे अचानक फुटली; व भारतासाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला. आक्रमक खेळू लागलेल्या अली याला बुमराह याने चपळाईने धावबाद केले. मात्र अली बाद झाल्यानंतर जमान याने अचानक "टॉप गिअर' टाकत भारतीय गोलंदाजांची अक्षरश: धुलाई सुरु केली. जमान याने फिरकी गोलंदाजांना ठोकलेले षटकार विशेष प्रेक्षणीय होते. संयमाने अर्धशतक पूर्ण केलेल्या जमान याने दुसऱ्या टप्प्यात आक्रमक खेळ पहिलेवाहिले शतकही पूर्ण केले. अखेर मध्यमगती गोलंदाज हार्दिक पांड्या याच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजा याने एक अत्यंत अवघड झेल घेत जमान याची खेळी संपुष्टात आणली. अर्थात, जमान बाद झाल्यानंतरही पाकिस्तानच्या धावांचा ओघ आटला नाही. आझम व शोएब मलिक (12 धावा,16 चेंडू) यांनी प्रभावी खेळ करीत भारतीय गोलंदाजांना डोके वर काढण्याची संधी मिळू दिली नाही.

डावाचे 40 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या भुवनेश्‍वर याने मलिक याचा अडथळा दूर केला. मात्र दुसरीकडे आझम याने संयम व आक्रमकता यांचे सुरेख मिश्रण करीत पाकची धावसंख्या वेगाने वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली. मलिक याच्यानंतर आलेल्या मोहम्मद हफीझनेही आक्रमक खेळ करीत आझम याला पूरक साथ दिली. अर्धशतकाजवळ असलेला आझम हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नांत फिरकीपटू केदार जाधव (27 धावा, 1 बळी) याच्या गोलंदाजीवर बाद झाला. आझम बाद झाल्यामुळे पाकची धावगती मंदाविण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र हफीझ याने सर्व सूत्रे हाती घेतल्याने पाकने 46 व्या षटकांतच 300 चा टप्पा पार केला. अवघ्या 34 चेंडूंत नाबाद अर्धशतक झळकाविलेल्या हफीझ याने इमाद वसीम (25 धावा, 21 चेंडू) याच्या साथीत पाकची धावगती घसरु न देण्याची खबरदारी घेतली.

या स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या भारतीय गोलंदाजांनी आज निराश केले. बळी घेण्यात व धावांचा ओघ थांबविण्यात आलेल्या अपयशाबरोबरच भारतीय गोलंदाजांनी तब्बल 13 "वाईड' व 3 "नो बॉल'सह 25 अवांतर धावांची खैरातही केली. काही प्रमाणात भुवनेश्‍वर याचा अपवाद वगळता इतर कोणताही भारतीय गोलंदाज पाकिस्तानी फलंदाजांना फारसा अडचणीत आणू शकला नाही. पाकिस्तानने भारताविरुद्ध उभारलेली ही द्वितीय सर्वोच्च धावसंख्या आहे. फलंदाजीसाठी आता उतरणाऱ्या भारतीय फलंदाजांवर या धावसंख्येचे मोठे दडपण असेल, असे मानण्यात येत आहे.

Web Title: India to chase 339