भारतीय कुमार संघ सॅफ फुटबॉलचा विजेता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

भारतीय कुमार संघाने (18 वर्षांखालील) सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद अपेक्षेनुसार जिंकले. काठमांडू येथे झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात कमालीचा धसमुसळा खेळ झाला. एक अतिरिक्त खेळाडू असलेल्या भारताने अंतिम लढतीत 2-1 बाजी मारली. भारताने ही स्पर्धा प्रथमच जिंकली आहे.

धसमुसळ्या खेळानंतरही अंतिम लढतीत वर्चस्व
मुंबई : भारतीय कुमार संघाने (18 वर्षांखालील) सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद अपेक्षेनुसार जिंकले. काठमांडू येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कमालीचा धसमुसळा खेळ झाला. एक अतिरिक्त खेळाडू असलेल्या भारताने अंतिम लढतीत 2-1 बाजी मारली. भारताने ही स्पर्धा प्रथमच जिंकली आहे.

भारतास 2015 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, पण विक्रम प्रताप सिंगने दुसऱ्या मिनिटास भारतास आघाडीवर नेले; पण यिसिनने 38 व्या मिनिटास बांगलादेशला बरोबरी साधून दिली. अखेर रवी बहादूर राणाने भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला.

भारताने दुसऱ्याच मिनिटास आघाडी घेतल्यामुळे काही वेळातच दोन संघांत बाचाबाची सुरू झाली. विक्रमच्या फाऊलवरून दोन्ही संघ हातघाईवर आले. त्यामुळे भारताचा गुरकिरत आणि बांगलादेशचा मोहम्मद फहीम यांना रेड कार्ड दाखवून बाहेर काढण्यात आले. फहीमला यापूर्वीच यलो कार्ड होते, पण गुरकिरतला थेट रेड कार्डच दाखवले गेले. प्रतिस्पर्धी संघ आता 10 खेळाडूंचे झाले होते.

भारताच्या आक्रमणास बांगलादेश प्रतिआक्रमणाने उत्तर देत होते. यिसिन याने 38 व्या मिनिटास बांगलादेशला बरोबरी साधून दिली, पण गोल केल्याचा आनंद शर्ट काढून साजरा केल्याबद्दल फहीमला पिवळे कार्ड दाखवले गेले. हे त्याचे दुसरे पिवळे कार्ड होते, त्यामुळे त्याला मैदान सोडणे भाग पडले. भारताचा एक खेळाडू जास्त झाला होता.

बांगलादेशने त्यानंतर प्रतिआक्रमण सुरू ठेवले, पण बचावाकडेही जास्त लक्ष दिले. पूर्वार्धातील बरोबरी निर्धारीत 90 मिनिटे संपल्यावरही कायम होती, पण भरपाई वेळेत भारताने निर्णायक गोल केला.

सॅफ विजेतेपद जिंकण्यासाठी मोक्‍याच्यावेळी सर्वोत्तम कामगिरी करावीच लागेल, हेच मी सांगत होतो. रवीने भरपाई वेळेत गोल करून हेच करून दाखवले. आमचा संघ स्पर्धेत सर्वोत्तमच ठरला नाही, तर आम्ही सर्वात प्रभावी कामगिरी केली. या विजेतेपदास साजेशी कामगिरी आम्ही केली.
- फ्लॉईड पिंटो, मार्गदर्शक

वयोगट स्पर्धेतील प्रभाव
- पंधरा वर्षांखालील संघ सॅफ स्पर्धेत विजेता
- 16 वर्षांखालील संघ आशियाई स्पर्धेस पात्र
- 18 वर्षांखालील संघ आता सॅफ विजेता
- 19 वर्षांखालील संघाची नोव्हेंबरमध्ये आशियाई पात्रता स्पर्धा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india jwins saff under 18 football tournament