अखेरच्या पाच मिनिटांत गोलरक्षक काढल्यामुळे भारताचा पराभव

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

एखाद्या लढतीचा गोलफलक किती फसवा असतो, हेच पर्थला झालेल्या या कसोटीच्या निकालातून दिसते. वेगवान सुरवात ही ऑस्ट्रेलियाची खासीयत; पण भारतीयांनी कमालीची धडाकेबाज सुरवात करीत कांगारूंवर दडपण आणले.

मुंबई : भारताने ताकदवान ऑस्ट्रेलियाच्या तोडीस तोड आक्रमणे केली; पण गोलच्या संधी दवडल्या, त्यातच अखेरच्या पाच मिनिटांत केलेले कमालीचे पूर्ण आक्रमण बूमरॅंगसारखे उलटले आणि भारतास ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या हॉकी कसोटीत 0-4 अशी हार पत्करावी लागली. 

एखाद्या लढतीचा गोलफलक किती फसवा असतो, हेच पर्थला झालेल्या या कसोटीच्या निकालातून दिसते. वेगवान सुरवात ही ऑस्ट्रेलियाची खासीयत; पण भारतीयांनी कमालीची धडाकेबाज सुरवात करीत कांगारूंवर दडपण आणले.

पहिल्या सत्र भारताच्या वर्चस्वाने संपणार असे वाटत असताना कांगारूंनी पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. दुसऱ्या सत्रास याची पुनरावृत्ती झाली. तिसऱ्या सत्रात पूर्णपणे आणि चौथ्या सत्राच्या सुरवातीस भारतीय आक्रमण जोशात होते. त्याला अधिक ताकद देण्यासाठी भारताने गोलरक्षकास काढले. त्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने सामन्यातील अखेरच्या दोन मिनिटांत दोन आक्रमणे यशस्वी करीत गोलफलक 4-0 केला. 

ब्लेक गोव्हर्स तसेच जेरेमी हेवर्ड यांनी प्रत्येकी दोन गोल करीत ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला; पण त्याहीपेक्षा गोलरक्षक जोहान डर्स्ट आणि कर्णधार एडी ओकेंदेन याने गोलक्षेत्रात केलेला बचाव मोलाचा ठरला. त्याला सहकाऱ्यांची तेवढीच तोलामोलाची साथ लाभली. ऑस्ट्रेलियाच्या या भक्कम बचावामुळे भारतास सहा पेनल्टी कॉर्नर, तसेच मैदानी गोलच्या किमान चार संधी लाभूनही गोल करता आला नाही. 

मधल्या फळीचे वर्चस्व निर्णायक 
पहिला गोल स्वीकारल्यावर भारताने श्रीजेशऐवजी कृष्णन पाठकला मैदानात उतरवले. त्याचा बचावही चांगलाच होता. दुसऱ्या गोलनंतर कमालीचे आक्रमक झालेल्या ऑस्ट्रेलियास त्याने चांगले रोखले होते. ऑस्ट्रेलियाची मधली फळी भारतीयांपेक्षा खूपच सरस ठरली. नेमकी हीच बाब दोघातील फरक ठरली. भारतीय मार्गदर्शक ग्रॅहम रीड यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून याच गोष्टीकडे लक्ष दिले आहे. पण तरीही ऑस्ट्रेलियन्स खूपच सरस ठरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India lost to Australia in First Hockey Test