भारताची अपयशी सलामी एच. एस. प्रणॉयला ब्रेक; तर साईना नेहवालचा पराभव 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांतची विश्रांती; तसेच एच. एस. प्रणॉयला दिलेला ब्रेक यामुळे भारताच्या दोन्ही संघांना थॉमस उबेर बॅडमिंटन स्पर्धेत सलामीला हार पत्करावी लागली. साईना नेहवालच्या पराभवामुळे भारताच्या जखमेवर मीठच चोळले गेले. 

मुंबई - पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांतची विश्रांती; तसेच एच. एस. प्रणॉयला दिलेला ब्रेक यामुळे भारताच्या दोन्ही संघांना थॉमस उबेर बॅडमिंटन स्पर्धेत सलामीला हार पत्करावी लागली. साईना नेहवालच्या पराभवामुळे भारताच्या जखमेवर मीठच चोळले गेले. 

बॅंकॉकला सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय पुरुषांसमोर सलामीला फ्रान्सचे आव्हान होते. विजयी सुरवात अपेक्षित असूनही भारताने एच. एस. प्रणॉयला विश्रांती दिली. परिणामी, 1-4 पराभव पत्करण्याची वेळ आली. भारतास आता उपांत्यपूर्व फेरीसाठी नऊ वेळचे विजेते चीन; तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयच हवा आहे. 

बी. साई प्रणीतने त्याची एकेरीची लढत 30 मिनिटांत झटपट जिंकली; पण त्यानंतर यश दुरावत गेले. जागतिक क्रमवारीत 38 वे असलेले श्‍लोक रामचंद्रन- एम. आर. अर्जुन 47व्या स्थानी असलेल्या जोडीविरुद्ध हरले; तर समीर वर्माचा प्रतिस्पर्धी त्याच्यापेक्षा वीस क्रमांकानी खालचा होता, तरीही त्याला तीन गेममध्ये पराभव पत्करावा लागला. या परिस्थितीत सन्यम शुक्‍ला-अरुण जॉर्जने आव्हान दिले नाही, त्यात नवल ते काय? वेगाने प्रगती करीत असलेला लक्ष्य सेन जागतिक क्रमवारीत 177व्या स्थानी असलेल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पराजित झाला. 

पुरुषांमधील पराभवाचे दुःख कमी होण्यापूर्वीच साईना पराजित झाल्याची बातमी आली आणि महिला संघ कॅनडाविरुद्ध 1-4 फरकानेच पराभूत झाला. साईना नेहवाल जागतिक क्रमवारीत चौदाव्या असलेल्या मिशेल लीविरुद्ध पराजित झाली. साईनाने मिशेलविरुद्धच्या यापूर्वीच्या दोन्ही लढती जिंकल्या होत्या, त्यामुळे साईनाच्या तीन गेममधील पराभवाच्या यातना जास्त झाल्या. 

साईनाच्या पराभवानंतर विजय कोण देणार, हा प्रश्‍न होता. वैष्णवी रेड्डीला 28 मिनिटेच लढत देता आली. जे मेघना आणि पूर्विषा एस. राम याने भारताचे खाते उघडले; पण श्री कृष्णा प्रिया 22 मिनिटांत पराजित झाल्याने भारताच्या धूसर आशाही संपल्या. प्राजक्ता सावंत-संयोगिता घोरपडेनेही फारसा प्रतिकार केला नाही.

Web Title: India make disastrous start in Thomas Uber Cup Final