विश्‍वकरंडक कबड्डीत भारत अजेय 

शैलेश नागवेकर : सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 22 ऑक्टोबर 2016

इराणविरुद्ध भारताची हॅटट्रिक
2004 : भारताचा इराणवर 55-27 असा विजय
2007 : भारताचा इराणवर 29-19 असा विजय
2016 : भारताचा इराणवर 38-29 असा विजय

अजय ठाकूरच्या तुफानी चढायांमुळे पिछाडीनंतर इराणला धूळ चारली 

अहमदाबाद : मध्यांतरानंतरची सहा गुणांची पिछाडी... वर्चस्वाला शह मिळण्यासाठी जमा झालेले काळे ढग अशा कठीण परिस्थितीत अजय ठाकूरने केलेल्या तुफानी आणि निर्णायक चढायांच्या जोरावर भारताने इराणचे आव्हान 38-29 असे मोडून काढले आणि सलग तिसऱ्यांदा विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवले. या एका सामन्यात चढायांमध्ये तब्बल 12 गुण मिळवणारा अजय ठाकूर हाच भारताच्या विजयाचा खरा हिरो ठरला. 

जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत इराणने भारताला नेहमीच कडवी लढत दिली आहे. त्यातच त्याच तीन खेळाडू प्रो कबड्डीत खेळत असल्यामुळे भारतासमोर आव्हान सोपे नव्हते. मध्यांतरानंतर 13-19 अशी पिछाडी दी एरिना ट्रान्सस्टेडिया येथे खच्चून गर्दी करणाऱ्या भारतीय पाठीराख्यांच्या काळजाचा ठोका चुकवत होती; पण याच कठीण परिस्थितीत बाजीगर होणारी कामगिरी करणाऱ्या अजयने कमालीच्या चढाया केल्या. त्याच्या झंझावातासमोर इराणचा भक्कम बचाव खचला. कर्णधार अनुप कुमारने पकड मिळताच संयमी खेळ करत संघाला विजयी पथावर ठेवले. अजय ठाकूरने सलग तीन सामन्यांत दहापेक्षा अधिक गुण मिळवले. नितीन थोमरनेही सहा गुण मिळवून त्याला चांगली साथ दिली. सुरजित आणि संदीप नरवालच्या पकडीही निर्णायक ठरल्या. 

संदीप नरवाल आणि अजय ठाकूर यांनी आपापल्या पहिल्या चढाईत गुण मिळवले आणि भारताने 2-0 अशी शानदार सुरुवात केली; पण मेराज शेखने आपली डु ऑर डाय चढाई असतानाही संदीप नरवालला बाद करून इराणला पहिला गुण मिळवून दिला. पाठोपाठ अब्दोफलनेही सुरेंद्र नाडाला चकवून बोनस गुण मिळवला. तेथेच इराणने आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली. यंदाच्या प्रो कबड्डीतील सर्वांत यशस्वी चढाईपटू ठरलेल्या प्रदीप नरवालच्या सलग दोन पकडी झाल्या आणि भारताचा आत्मविश्वास काहीसा कमजोर होण्यास सुरुवात झाली; पण अनुप आणि अजय ठाकूरने बोनस मिळवत 7-7 अशी बरोबरी साधली; पण मेराज शेखने आपल्या डु ऑर चढाईत मनजित आणि मोहित चिल्लर यांना बाद केले. भारताची बचाव फळी तेथे कमजोर झाली. मेराजने त्यानंतर राहुल आणि नाडा यांनाही बाद केले. 

बघता बघता भारताकडे एकच खेळाडू शिल्लक असल्याने आणि चढाई करण्याची संधी असल्याने नितीन थोमरला मैदान आणण्यात आले. त्याने बोनस आणि एक गुण मिळवत लोण टाळला असला तरी काही वेळात लोणची नामुष्की भारताला स्वीकारावी लागलीच. मध्यांतराला घेतलेली 18-13 अशी आघाडी इराणचे वर्चस्व सिद्ध करू लागली होती. मध्यांतरानंतर भारताला संयम राखत सर्वस्व देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातच सुरुवातीस मेराजने मनजित चिल्लरला बाद केले. त्यानंतर मनजितला राखीव खेळाडू करण्यात आले; पण अजय ठाकूरने एकाच चढाईत दोन गुण मिळवले. त्यामुळे संपूर्ण संघात चैतन्य संचारले आणि तेथूनच सामन्यास कलाटणी मिळत गेली. 20-20 बरोबरी साधल्यानंतर 10 मिनिटे शिल्लक असताना इराणवर लोण दिला. भारताने 24-21 अशी आघाडी घेतली आणि मग मागे वळून पाहिले नाही.

Web Title: India records third successive win in Kabaddi World Cup