World Cup 2019 : रोहितची 'विराट' खेळी; पाकपुढे 337 धावांचे आव्हान

सुनंदन लेले
रविवार, 16 जून 2019

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : मँचेस्टरच्या गडद हवामानावर भरवसा ठेवून पाकिस्तानी कप्तान सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा अपेक्षित निर्णय भारतीय फलंदाजांनी चांगला उलटवला. रोहित शर्माने बहारदार शतक झळकावून भारताला 50 षटकात 5 बाद 336 धावांचा फलक उभारायला मदत केली. लोकेश राहुल (57 धावा) आणि विराट कोहलीने 77 धावांची खेळी उभारून रोहितला मस्त साथ दिली. महंमद आमीरने शेवटच्या षटकात टिच्चून मारा करून तीन फलंदाजांना बाद केले म्हणून धावफलकाला थोडातरी आळा बसला.

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : मँचेस्टरच्या गडद हवामानावर भरवसा ठेवून पाकिस्तानी कप्तान सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा अपेक्षित निर्णय भारतीय फलंदाजांनी चांगला उलटवला. रोहित शर्माने बहारदार शतक झळकावून भारताला 50 षटकात 5 बाद 336 धावांचा फलक उभारायला मदत केली. लोकेश राहुल (57 धावा) आणि विराट कोहलीने 77 धावांची खेळी उभारून रोहितला मस्त साथ दिली. महंमद आमीरने शेवटच्या षटकात टिच्चून मारा करून तीन फलंदाजांना बाद केले म्हणून धावफलकाला थोडातरी आळा बसला.

भारत-पाकिस्तान सामना चालू होण्याला दोन तास बाकी असताना मँचेस्टर शहरावर काळे ढग दाटून आले होते. नाणेफेक होताना किंचित भुरभुर चालू होईल का अशी भिती वाटत होती. बहुतेक सूर्य महाराजांनाही क्रिकेट बघायचा मोह आवरला नसेल म्हणून त्यांनी ढगांना बाजूला सरकावून ओल्ड ट्रॅफर्डवर हजेरी लावली. खेळ चालू होताना सगळ्यांचे लक्ष महंमद आमीरवर होते. दडपण घेईल तो रोहित शर्मा कसला. त्याने आमीरच्या शिस्तपूर्ण मार्‍याला मान देताना दुसर्‍या गोलंदाजांवर आक्रमण केले. भागीदारीचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर पाकिस्तानने रोहित शर्माला बाद करायची मोठी संधी दोनदा दवडली. धावबाद होताना रोहित पाठोपाठ दोनदा वाचला. 

रोहितच्या अर्धशतकानंतर काहीसा वेळ घेऊन लोकेश राहुलने अर्धशतक पूर्ण केले. 18व्या षटकातच भारताच्या 100 धावा फलकावर लागल्या. पंचांनी आमीर आणि वाहब रियाज दोघा गोलंदाजांना खेळपट्टीवर पळण्याची दोनदा ताकीद दिल्याने पाकिस्तान संघावरचे दडपण वाढले. राहुल बाद झाल्यावर प्रेक्षकांनी विराट कोहलीचे आवाजी स्वागत केले. दोन दादा फलंदाजांनी मग सर्व गोलंदाजांचा समाचार घेतला. खराब चेंडूंवर मोठे फटके मारताना रोहित मागे पडला नाही. रोहित शर्माला आखूड टप्प्याचा मारा करून गोलंदाजांनी कप्तान सर्फराज अडचणीत टाकले. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाची सीमारेषा मोठी असल्याने आणि पाकिस्तानी खेळाडू चपळ नसल्याने दुहेरी धावा पळून काढणे सोपे जात होते. 

85 चेंडूत 3 षटकार 9 चौकारांसह रोहितने शतक पूर्ण केले तेव्हा प्रेक्षक आणि खेळाडूंसह वसीम अक्रम , वकार युनिस आणि रमिझ राजाही उभे राहून टाळ्या वाजवत होते. शतकानंतर रोहितने परत कंबर कसली आणि आक्रमण तेज केले. विराट कोहलीने अगदी सहज फलंदाजी करून अर्धशतक नोंदवले. 140 धावांची मोठी खेळी करून रोहित खराब फटका मारून बाद झाला आणि स्वत:वरची नाराजी त्याने बॅट पॅडवर आपटून व्यक्त केली. 

मागच्या सामन्याप्रमाणे संघ व्यवस्थापनाने चौथ्या क्रमांकावर हार्दिक पंड्याला बढती दिली. पंड्याने 26 धावांची छोटेखानी खेळी सादर केली आणि आमीरला षटकार मारायच्या नादात विकेट गमावली. धोनीही लगेच तंबूत परतला. विराट कोहलीने डोके शांत ठेवून संघाला 300 धावांचा टप्पा पार करून दिला. 47व्या षटकात मैदानावर पहिल्यांदा तुरळक पाऊस आला आणि पंचांनी खेळ थांबवला. 

परत खेळ चालू झाल्यावर 20 चेंडूत जास्तीत जास्त धावा काढायचा एकमेव विचार विराटच्या मनात घोळत होता. सर्फराजने हाणामारीच्या षटकांकरता आमीर - वाहब रियाजची षटके राखून ठेवली होती.  वाहबी रियाजला 10 षटकात 70 धावांचा मार पडला. दुसर्‍या बाजूला महंमद आमीरने विराट कोहलीला 77 धावांवर बाद केले. आमीरने 10 षटकात 47 धावा देऊन 3 फलंदाजांना बाद  केल्याने भारताला 5बाद 336 धावसंख्येवर समाधान मानावे लागले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India scores 337 runs against Pakistan in World Cup 2019