"मायदेशी वाघ; परदेशांत मांजर': भारत 135 धावांनी पराभूत 

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगिडी याने पदार्पणातच सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या डावात एनगिडीने अवघ्या 39 धावांत 6 भारतीय फलंदाज परतवित द. आफ्रिकेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. कासिगो रबाडा याने 47 धावांत 3 बळी घेत एनगिडीस पूरक साथ दिली. रोहित शर्माने चाचपडत केलेल्या 47 धावा हीच भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली

सेंच्युरियन - "मायदेशी वाघ; परदेशांत मांजर,' ही गेल्या काही वर्षांतील प्रतिमा कायम राखण्यात भारताला आज (बुधवार) यश आले. सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेच्या तिखट गोलंदाजीचा सामना करताना भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आज सामन्याच्या पाचव्या दिवशी विजयासाठी 287 धावांचा पाठलाग करत असताना भारताचा डाव अवघ्या 151 धावांत संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात 135 धावांनी विजयाची नोंद करत तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगिडी याने पदार्पणातच सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या डावात एनगिडीने अवघ्या 39 धावांत 6 भारतीय फलंदाज परतवित द. आफ्रिकेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. कासिगो रबाडा याने 47 धावांत 3 बळी घेत एनगिडीस पूरक साथ दिली. रोहित शर्माने चाचपडत केलेल्या 47 धावा हीच भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. 

काल नाबाद राहिलेल्या चेतेश्‍वर पुजारा (19 धावा - 47 चेंडू) व पार्थिव पटेल (19 धावा - 49 चेंडू) या भारतीय जोडीने आज खेळास प्रारंभ केला. मात्र भारतीय फलंदाज असह्य दडपणाखाली असल्याचे त्यांच्या देहबोलीतून जाणवत होते. यामध्येच पुजारास ए बी डिव्हिलयर्स याने सीमारेषेपासून अचूक "थ्रो' करत धावबाद केले. पहिल्या डावामध्येही पुजारा धावेचा अंदाज नसल्याने धावबाद झाला होता. आजही धावबाद झाल्याने पुजाराची ही लंगडी बाजु पुन्हा एकदा अधोरेखित झाली. पुजारा बाद झाल्यानंतर भारताचा मानहानीकारक पराभव होणार, हे जवळपास निश्‍चित झाले होते.

पुजारा बाद झाल्यानंतर तिसऱ्याच षटकांत रबाडाच्या गोलंदाजीवर "हूक' मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पटेलला मोर्ने मॉर्केल याने फाईनलेगला देखणा झेल घेत माघारी धाडले. यानंतर रोहित व मोहम्मद शमी ( 28 धावा - 24 चेंडू) यांच्यात झालेल्या 54 धावांच्या भागीदारीमुळे भारताचा पराभव आणखी लांबण्यास मदत झाली. 

कर्णधार विराट कोहली याच्या पहिल्या डावातील शतकी खेळीचा अपवाद वगळता सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजीस आलेले अपयश डोळ्यांत भरणारे ठरले. मायदेशात द्विशतके ठोकणारे भारतीय फलंदाज परदेशांत खेळपट्टीवर धड टिकु शकत नसल्याचेच पुन्हा एकदा पहावे लागले. 
 

Web Title: india south africa cricket