World Cup 2019 : भारत उपांत्य फेरीत; बांगलादेशचा 28 धावांनी पराभव

cricket
cricket

वर्ल्ड कप 2019 बर्मिंगहॅम : हिटमॅन रोहित शर्माने स्पर्धेतील चौथे शतक झळकावून भारताला बांगलादेश विरुद्ध 28 धावांचा विजय मिळवायला सिंहाचा वाटा उचलला. रोहित शर्माने (104 धावा) लोकेश राहुलसह सलामीला रचलेली 180 धावांची जबरदस्त भागीदारी मोठ्या धावसंख्येचा पाया ठरली. मुस्तफीजूरने 5 फलंदाजांना बाद केले तरी भारताला 314 धावा उभारता आल्या. इनफॉर्म फलंदाज शकीब अल हसनच्या 66 धावा आणि तळातील फलंदाजांनी जोरकस प्रयत्न केल्याने बांगलादेशाची मजल 286 पर्यंत गेली. हार्दिक पंड्या आणि बुमराने मिळून 7 फलंदाजांना बाद करून बांगलादेशचा डाव संपवला. विजयासह 13 गुणांनी भारताने उपांत्य फेरीतील स्थान 100% पक्के केले.  

नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यावर विराट कोहलीने त्वरित फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात दोन बदल केले गेले. गेल्या सामन्यातील चुकीची कुर्‍हाड केदार जाधववर पडली आणि त्याची जागा दिनेश कार्तिकला दिली गेली म्हणजेच संघात धोनी, दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत असे तीन विकेट किपर झाले. कुलदीप यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला मिळाली. 

सामन्याला सुरुवात झाली आणि तमीम इक्बालने 9 धावांवर खेळणार्‍या रोहित शर्माचा सोपा झेल सोडला. त्याच संधीचा फायदा घेत सहज सोप्या शैलीत फटकेबाजी चालू केली. अगोदरच्या सामन्यात अडखळत फलंदाजी करणार्‍या लोकेश राहुलला थोडा सूर गवसला. दोघा फलंदाजांनी खराब चेंडूंवर चौकार षटकार मारताना चांगल्या चेंडूंवर एकेरी दुहेरी धावा जमा केल्या. 3 षटकार मारल्याने रोहितचे अर्धशतक 45 चेंडूत पूर्ण झाले. त्यानंतर रोहित शर्माने आक्रमणाची धार वाढवली. विश्वास परत मिळवलेल्या राहुलने अर्धशतकी मजल मारली. बघता बघता रोहितने स्पर्धेतील चौथे शतक झळकावले आणि त्याने भारतीय संघ आणि प्रेक्षकांसह पत्नी - मुलीकडे बॅट उंचावून आनंद व्यक्त केला. त्याच झेपेत रोहित स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 

शतकानंतर रोहित जास्त काळ टिकला नाही. लोकेश राहुलने मोठी खेळी करायची संधी दवडली. चांगल्या 77 धावा करून राहुल बाद झाला. विराट कोहलीने झकास सुरुवात केल्यावर खराब चेंडूवर फटका मारताना सोपा झेल दिला. मुस्तफीजूरने विराट कोहली आणि हार्दिक पंड्यासह 5 फलंदाजांना बाद करून सामन्यात जिवंतपणा आणला. रिषभ पंत 48 आणि धोनीच्या 35 धावांमुळे भारताला 50 षटकांच्या अखेरीला 9 बाद 314 चा धावफलक उभारता आला.

मोठ्या धावसंख्येच्या पाठलागात तमीम इक्बाल, शकीब अल हसन आणि मुशफीकूर रहीमवर मुख्य मदार होती. तमीम इक्बालला शमीने गोलंदाजीला आल्यावर बाद करून पहिले खिंडार पाडले. छोटेखानी आकर्षक खेळी करून सौम्य सरकार आणि मुशफीकूर तंबूत परतले. शकीब अल हसनवर त्याचा काही परिणाम होत नव्हता. अर्धशतक करून तो झकास फलंदाजी करत होता.

अपेक्षित धावगतीचा आलेख सतत वर चढवत नेल्याने सामना बांगलादेशी फलंदाजांच्या आवाक्याबाहेर गेला. विंडीज समोरच्या सामन्यात आकर्षक खेळी रचणार्‍या लिटन दासला हार्दिकने स्लो बाउंन्सर टाकून चकवले. जेव्हा पंड्याने फसाव्या चेंडूवर शकीबला 66 धावांवर बाद केले तेव्हा बांगलादेशच्या पाठलागातील दम संपला असे वाटत असताना शब्बीर आणि शैफुद्दीनने (51 नाबाद ) फटकेबाजी करून शेवटपर्यंत चांगली लढत दिली. बुमराने शब्बीरला बोल्ड करून आव्हानातील हवा काढून घेतली. बुमरा - शमी - भुवनेश्वरच्या अनुभवी मार्‍यासमोर षटकाला 10पेक्षा जास्त धावा काढायचे आव्हान पचवता आले नाही.

सोनालीची हजेरी 
बांगलादेश संघाचे ‘वाजले की बारा’ गाणे म्हणत सोनाली कुलकर्णीने एजबास्टन मैदानावर सामन्याचा आनंद घेतला. 8 जुलैपासून नव्या सिनेमाचे शूटींग लंडनला होणार असल्याने सोनाली इंग्लंडला आली आहे. क्रिकेटची खरी शौकीन असल्याने सोनाली लंडनहून ट्रेन पकडून एकटी सामना बघायला एजबास्टन मैदानावर आली. ‘‘टीव्हीत काहीच मजा येत नाही...खरी मजा मैदानावर येऊन सामना बघण्याची आहे...मी खूप आनंद घेतला आजच्या सामन्याचा. रोहितचे बहारदार शतक कायम स्मरणात राहील माझ्या’’, सोनाली म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com