फिरकीचे चक्रीवादळ मोईनने रोखले

पीटीआय
शनिवार, 17 डिसेंबर 2016

चेन्नई - भारतीय गोलंदाजीचे घोंघावणारे वादळ रोखताना मोईन अलीने चिवट शतक केले. त्याच्या दोन भक्कम भागीदारीमुळे इंग्लंडने 2 बाद 21 या सुरवातीनंतर भारताविरुद्धच्या पाचव्या क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवसअखेर 4 बाद 284 अशी मजल मारली. मोईनच्या चिवट खेळीमुळे लोकल हीरो अश्‍विनला पहिल्या दिवशी एकही फलंदाज बाद करता आला नाही.

चेन्नई - भारतीय गोलंदाजीचे घोंघावणारे वादळ रोखताना मोईन अलीने चिवट शतक केले. त्याच्या दोन भक्कम भागीदारीमुळे इंग्लंडने 2 बाद 21 या सुरवातीनंतर भारताविरुद्धच्या पाचव्या क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवसअखेर 4 बाद 284 अशी मजल मारली. मोईनच्या चिवट खेळीमुळे लोकल हीरो अश्‍विनला पहिल्या दिवशी एकही फलंदाज बाद करता आला नाही.

चेन्नई खेळपट्टीने रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापासून चेंडूने फिरक घेण्यास सुरवात केली आहे; पण चेंडू खूपच हळू फिरक घेत आहे. त्याचा पुरेपूर फायदा मोईन अली, या मालिकेत अर्धशतकाचा रतीब टाकत असलेला ज्यो रुट आणि या दोघांची फलंदाजी पाहून आत्मविश्‍वास उंचावलेला बेअरस्टॉ यांनी घेतला. त्यामुळे मालिकेत दादागिरी करीत असलेल्या फिरकी त्रिकुटांपैकी जरा जास्त वेगाने चेंडू टाकणाऱ्या जडेजालाच यश लाभले. अमित मिश्रा तर धावांची खैरात करू लागला. अश्‍विनलाही प्रभाव पाडता आला नाही. आठव्या षटकापासून फिरकी सुरू झाली, तरी त्यास पूर्ण हुकूमत राखता आली नाही.

इंग्लंडचे सलामीवीर नेहमीप्रमाणे लवकर परतल्यावर रुट आणि मोईन अलीने चांगला प्रतिकार केला. त्यांनी फिरकीला पूर्ण वर्चस्वापासून रोखले. मोईन प्रसंगी चकत होता; पण त्याचे दडपण त्याने घेतले नाही. संधी मिळताच आक्रमण हेच त्याचे धोरण होते. त्याला भोपळा फोडण्यापूर्वी राहुलने जीवदान दिले. त्याची पुरेपूर शिक्षा मोईनने दिली. रिव्ह्यूनेही त्याला वाचवले. जम बसल्यावर त्याने अश्‍विनला मारलेले स्वीप जबरदस्त होते. हेच तंत्र रुट आणि बेअरस्टॉने अमलात आणले.

रुट स्वीप करतानाच बाद झाला. त्याच्याविरुद्धचा भारताचा रिव्ह्यू यशस्वी ठरला. त्याला बाद केल्यावर इंग्लंडचे डाव गुंडाळण्याचे स्वप्न बेअरस्टॉने धुळीस मिळवले. त्याने मिश्राला पुढे सरसावत फटकारले. त्याने जडेजा आणि अश्‍विनला तर स्वीपचा षटकार मारला. एकंदरीत चक्रीवादळाचा खेळपट्टीवर फारसा परिणाम झाला नसल्याचेच दिसले. कोळशाची धग बसलेल्या खेळपट्टीत कोणताही ओलसरपणा नाही. आता मोईन अली इंग्लंडला किती धावांपर्यंत नेतो, यावरच कसोटीचे भवितव्य ठरू शकेल.

मुंबईच्या सुरवातीचीच कॉपी, निकाल काय
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या दिवशी 94 षटकांत 5 बाद 288 धावा केल्या होत्या. त्यांनी पहिल्या डावात 400 धावाही केल्या, तरीही ते एका डावाने पराजित झाले. आता चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने 4 बाद 284 अशी सुरवात केली आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाची तर जवळपास कॉपी झाली. आता निकालाची कॉपी होणार का? हे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

इंग्लंड ः पहिला डाव ः ऍलिस्टर कूक झे. कोहली गो. जडेजा 10, किटॉन जेनिंग्ज झे. पटेल गो. ईशांत 1, जो रूट झे. पटेल गो. जडेजा 88 (144 चेंडूंत 10 चौकार), मोईन अली खेळत आहे 120 (222 चेंडूंत 12 चौकार), जॉनी बेअरस्टॉ झे. राहुल गो. जडेजा 49 (90चेंडूंत 3 चौकार), बेन स्टोक्‍स खेळत आहे 5, अवांतर ः 11 (बाईज 4, लेग बाय 1, वाइड 1, दंड धावा 5), एकूण ः 90 षटकांत 4 बाद 284.

बाद क्रम ः 1-7, 2-21, 3-167, 4-253.

गोलंदाजी ः उमेश यादव 12-1-44-0, ईशांत शर्मा 12-5-25-1, रवींद्र जडेजा 28-3-73-3, आर. अश्‍विन 24-1-76-0, अमित मिश्रा 13-1-52-0, करुण नायर 1-0-4-0.

दृष्टिक्षेपात
- रवींद्र जडेजाने ऍलिस्टर कूकला या मालिकेत पाचव्यांदा बाद केले. यापूर्वी केवळ एकदाच, तेही 117 चेंडूंत
- कूकला यापूर्वी एकाच मालिकेत अश्‍विन, स्टुअर्ट क्‍लार्क तसेच मिशेल जॉन्सन, मॉर्नी मॉर्कल, ईशांत शर्मा आणि उमर गुलने प्रत्येकी चार वेळा बाद केले होते.
- कूकची या मालिकेतील सरासरी 12. या मालिकेपूर्वी डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्धची सरासरी 101.00 होती
- मालिकेपूर्वी डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध 201 चेंडूंत एकदा बाद, तर या वेळी जडेजाविरुद्ध सरासरी 33 चेंडूंत एकदा
- ज्यो रूटने भारताविरुद्धच्या 11 कसोटीत 11 वेळा पन्नासपेक्षा जास्त धावा
- रूटच्या या वर्षात 1471 धावा. एका वर्षातील सर्वाधिक धावांचा इंग्लंडचा विक्रम मोडण्यासाठी दहा धावांची गरज
- रूटच्या मालिकेतील पाचही कसोटीत पन्नासपेक्षा जास्त धावा. ही कामगिरी 1981 नंतर प्रथमच पाहुण्या फलंदाजाकडून, यापूर्वी गूच आणि बोथम 1981 मध्ये
- विराट कोहलीचे कसोटी झेलांचे अर्धशतक, ही कामगिरी करणारा तेरावा भारतीय
- मोईन अलीचे या मालिकेतील दुसरे शतक. भारतात ही कामगिरी इंग्लंडचा सहावा फलंदाज. यापूर्वी कूक, बॅरिंग्टन, काऊड्री, गॅटिंग आणि स्ट्रॉस
- कूकच्या कारकिर्दीतील 11 हजार धावा पूर्ण. ही कामगिरी 10 वर्षे 290 दिवसांच्या कसोटी कारकिर्दीत. सर्वांत जलद.

Web Title: india vs england 5th test match