esakal | INDvsNZ : भारताने न्यूझीलंडमध्ये फडकाविला झेंडा; सलग दुसरा विजय
sakal

बोलून बातमी शोधा

India vs New Zealand, 2nd T20I India wins lead 2-0

INDvsNZ : भारताने न्यूझीलंडमध्ये फडकाविला झेंडा; सलग दुसरा विजय

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

ऑकलंड : फलंदाजीला खूप पोषक नसणार्‍या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या मुख्य फलंदाजांना बाद करण्यात यश आल्याने धावफलकाला अपेक्षित बाळसे चढले नाही. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 5 बाद 131 धावांवर रोखले. केएल राहुल आणि श्रेयस अय्यरची बॅट सलग दुसर्‍या सामन्यात तळपली. खेळपट्टीचा अंदाज घेऊन जास्त धोके न पत्करता फलंदाजी केल्याने भारतीय फलंदाजांनी विजयाचा पल्ला 18व्या षटकात फक्त 3 फलंदाजांच्या विकेटस् गमावून गाठला. सलग दुसरा टी20 सामना जिंकून भारतीय संघाने 2-0 आघाडी घेतली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून सामना जिंकण्यात अपयश आलेले असूनही न्यूझीलंड संघाने दुसर्‍या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. कप्तान कोहलीने नवा चेंडू शार्दूल ठाकूरला दिला आणि मार्टीन गुप्टीलने दोन षटकार ठोकून त्याचे स्वागत केले. ईडन पार्कच्या खेळपट्टीवर चेंडू काहीसा उडत होता तसेच थांबून येत होता ज्याने पाय पुढे टाकून फटके मारणे जमत नव्हते. 48 धावांची सलामी मिळूनही मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल यजमान संघाच्या फलंदाजांना करता आली नाही कारण दर थोड्या वेळाने फलंदाजाला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले.

पुण्यात सुरु झाले शिवभोजन? पाहा कोठे?

48 धावा फलकावर लागल्या असताना पहिला फलंदाज बाद झाल्यावर पुढचे तीन फलंदाज बाद करायला जास्त वेळ लागला नाही. जडेजाने ग्रंथोम आणि कप्तान विल्यम्सनला पाठोपाठ बाद केले. 15 षटकांच्या खेळानंतर धावफलकावर फक्त 94 धावा दिसत होत्या. तरुण आक्रमक फलंदाज सिफर्टने नाबाद 33 धावा केल्याने न्यूझीलंडला 132 धावांचे आव्हान उभारता आले. भारताकडून बुमरा, शमी, जडेजाची गोलंदाजी खूपच प्रभावी ठरली.

रोहित शर्माने पहिल्याच षटकात 2 चौकार मारून झकास सुरुवात केली पण टीम साउदीला परत मोठा फटका मारायच्या नादात रोहित बाद झाला. साउदीनेच साध्या चेंडूवर विराट कोहलीला बाद केले. पहिल्या सामन्यात सुंदर फलंदाजी करणारा के एल राहुल चोरट्या धावा काढायच्या प्रयत्नात बर्‍याच वेळा धावबाद होताना वाचला. त्याच संधीचा फायदा घेत राहुलने तंत्रशुद्ध फलंदाजी करत सलग दुसरे अर्धशतक साजरे केले.

पहिल्या सामन्यात सामनावीर श्रेयस अय्यरने तडाखेबाज फलंदाजी करून राहुलला मस्त साथ दिली. दोघांनी 85 धावांची वेगवान भागीदारी रचून भारताचा विजय जवळ आणला. श्रेयस अय्यर तीन षटकारांसह  44 धावा करून बाद झाल्यावर राहुल 57 धावांवर सामना जिंकून नाबाद परतला.

loading image