Virat Kohli : मन आणि शरीरातील समन्वय कामी आला ;विराट

भारत वि. पाकिस्तान सामन्यानंतर खेळाडू भावनिक झाले. फरक इतकाच होता, की पाकिस्तानी चाहत्यांच्या डोळ्यात दु:खाश्रू होते
Virat Kohli
Virat Kohlisakal

सिडनी : भारत वि. पाकिस्तान सामन्यानंतर खेळाडू भावनिक झाले. फरक इतकाच होता, की पाकिस्तानी चाहत्यांच्या डोळ्यात दु:खाश्रू होते; तर भारतीय चाहत्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू. सामना संपल्यावर कप्तान रोहित शर्माने पळत आत येऊन विराटला उचलून गोल फिरवून आनंद व्यक्त केला. इतकेच काय, नेहमी खूप संयम दाखवणाऱ्‍या राहुल द्रविडने आपल्या भावना व्यक्त करताना काही लपवले नाही.

सामन्यानंतर विराट कोहलीने प्रथम हार्दिकचे कौतुक केले. ‘हार्दिक फलंदाजीला आला तेव्हा स्थिती नाजूक होती. हार्दिक विचारांनी सकारात्मक राहिला आणि त्याने सुरुवातीला मोठे फटके मारले, ज्याने माझ्यावरचे दडपण कमी झाले. आपण सामना शेवटपर्यंत घेऊन जाऊ म्हणजे दडपण त्यांच्यावर येईल असे तो म्हणाला. म्हणून आमच्यात झालेल्या शतकी भागीदारीला महत्त्व आहे’ विराट म्हणाला.

‘विराट समोर असताना विश्वास जाणवतो, की आपण कोणत्याही परिस्थितीतून विजयाकडे वाटचाल करू शकतो’ विराटचे कौतुक करताना हार्दिक बोलू लागला. ‘त्याचे पळून धावा काढण्याचे तंत्र अफलातून आहे. तसेच त्याचे निर्णायक क्षणी हॅरीस राऊफला मारलेले दोन षटकार अविश्वसनीय होते. हे फक्त विराटच करू शकतो’ हार्दिक म्हणाला.

विराटला विचारता त्याने पाकिस्तानसमोरच्या खेळीचे वर्णन थोडे अजून खोलात जाऊन केले. ‘नजर बसल्यावर मला दडपणाचे ओझे जाणवले नाही. माझ्या शरीर आणि मनातील समन्वय कामी आला. मी स्वत:ला फक्त बॅट घट्ट पकडायला सांगत होतो, जेणेकरून फटका मारताना बॅट हातात फिरली नाही पाहिजे. शेवटच्या तीन षटकांत दडपणाचे चक्र समोरच्या संघाकडे फिरवण्यात यश आले. ते काही क्षण असे होते, की मला काहीच ऐकू येत नव्हते.

गरजेच्या वेळी म्हणूनच मला मोठे फटके मारता आले. हा सामना हे वातावरण कायम स्मरणात राहणार आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे स्पर्धेची सुरुवात चांगली झाली. गेल्या टी२० वर्ल्डकपमध्ये आणि आशिया कप स्पर्धेत सुरुवात खराब झाली, तर नंतर पुनरागमन करणे कठीण जाते हे माहीत होते. तरीही मी म्हणेन, की अजून खूप काही करणे स्पर्धेतील बाकी आहे. जास्त लक्ष विचलित करून चालणार नाही एका विजयानंतर’ विराटने विचार स्पष्ट केले. सोमवारी भारतीय संघ मेलबर्नहून सिडनी शहरात दाखल झाला. मंगळवार, बुधवार सराव करून २७ ऑक्टोबरला भारतीय संघ दुसरा सामना त्यामानाने साध्या प्रतिस्पर्ध्याशी म्हणजे नेदरलँडशी करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com