esakal | INDvsSA : भारताची नाणेफेक जिंकून फलंदाजी; नदीमचे पदार्पण
sakal

बोलून बातमी शोधा

cricket

पावसाचे सावट कायम 
पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात पावसाचे सावट होते. पुणे येथील दुसऱ्या कसोटीत पावसाने कृपा केल्यामुळे सामना पार पडला. विशेष म्हणजे भारताने चौथ्या दिवशी विजय मिळविल्यावर पावसास सुरवात झाली होती. आता रांचीतही पावसाने त्यांचा पाठलाग केला आहे. पहिल्या दिवशी हवामान अनुकूल राहणार असले, तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाची शक्‍यता आहे.

INDvsSA : भारताची नाणेफेक जिंकून फलंदाजी; नदीमचे पदार्पण

sakal_logo
By
सुनंदन लेले

रांची : पहिल्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आजपासून (शनिवार) सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात फिरकीपटू शादाब नदीमचे पदार्पण झाले आहे. 

महेंद्रसिंह धोनीच्या रांचीत आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटीतही विजय मिळवून 'व्हाइट वॉश'चे उद्दिष्ट बाळगून आहे. दक्षिण आफ्रिका संघाला या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघात बदल करावा लागला आहे. भारतीय संघाने खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेऊन ईशांत शर्माच्या जागी कुलदीप यादव या 'चायनामन' गोलंदाजाला खेळविण्याची तयारी ठेवली होती. मात्र, शुक्रवारच्या सराव सत्रानंतर त्याचा खांदा दुखावल्याने त्याला वगळण्यात आल्याचे जाहीर करण्यात आला. त्याच्या जागी आता डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम याचा समावेश करण्यात आला आहे. नदीमला अंतिम संघात स्थान देण्यात आले आहे.

खेळपट्टी फिरकीला जास्त अनुकूल असल्याने पाहुण्या संघाची अजूनच गाळण उडाली आहे. रांचीच्या मैदानावर सराव करून भारतीय संघ सज्ज झाला आहे. तसे बघायला गेले तर मालिकेचा निकाल पुणे कसोटी जिंकल्यावरच लागला होता. क्रिकेटच्या परिभाषेत ज्याला 'डेड रबर' म्हणजे एकूण निकालाच्या दृष्टीने निरर्थक सामना म्हटले जाते; पण 'आयसीसी' जागतिक कसोटी स्पर्धा सुरू झाल्याने अशा लढतीचे महत्त्व वाढले आहे. साहजिकच दक्षिण आफ्रिकेचा संघ सुधारित खेळ करून कसोटी वाचवायला धडपडणार आहे. भारतीय संघदेखील 'व्हाइट वॉश' देण्याच्या इराद्याने उतरेल, यात शंका नाही. विजयाने त्यांचे कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेतील गुण आणि आघाडी वाढणार यात शंकाच नाही. 

'बीसीसीआय'ने कुलदीपच्या जागी शाहबाज नदीमचा समावेश केल्याचे प्रसिद्धीस दिले. कुलदीपचा डावा खांदा दुखावला असून, त्याला मालिकेत कव्हर करण्यासाठी नदीमचा समावेश केल्याचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले आहे.

पावसाचे सावट कायम 
पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात पावसाचे सावट होते. पुणे येथील दुसऱ्या कसोटीत पावसाने कृपा केल्यामुळे सामना पार पडला. विशेष म्हणजे भारताने चौथ्या दिवशी विजय मिळविल्यावर पावसास सुरवात झाली होती. आता रांचीतही पावसाने त्यांचा पाठलाग केला आहे. पहिल्या दिवशी हवामान अनुकूल राहणार असले, तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाची शक्‍यता आहे.