भारताची अपेक्षित विजयी सलामी

वृत्तसंस्था
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

भारताने आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत अपेक्षित विजयी सलामी देताना कझाकिस्तानला ४-१ असे पराजित केले.

मुंबई / मनिला - भारताने आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत अपेक्षित विजयी सलामी देताना कझाकिस्तानला ४-१ असे पराजित केले. साई प्रणीत- चिराग शेट्टीची दुहेरीतील धक्कादायक हार सोडल्यास भारतास विजयासाठी प्रयास पडले नाहीत.

माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू किदांबी श्रीकांत तसेच लक्ष्य सेन आणि शुभंकर डे यांनी त्यांच्या एकेरीच्या लढतीत सहज विजय मिळवला. एम. आर. अर्जुन - ध्रुव कपिला या नवोदित जोडीनेही दोन गेममध्येच बाजी मारली; पण जागतिक स्पर्धेत एकेरीत ब्राँझ जिंकलेला साई प्रणित आणि चिराग शेट्टीची जोडी जमवण्याचा प्रयत्न काही खास यशस्वी झाला नाही. त्यांना पहिला गेम जिंकल्यावर हार पत्करावी लागली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्रीकांतने २३ मिनिटांत दिमित्री पानारिन याला २१-१०, २१-७ असे नमवले. लक्ष्य सेनने त्याच्यापेक्षा जास्त झटपट विजय मिळवताना अर्तर नियाझोव याला २१ मिनिटांस २१-१३, २१-८ असे हरवले. शुभंकरने खैतमुरत कुलमातोव याचा २१-११, २१-५ असा २६ मिनिटांत पाडाव केला. प्रणीत - चिरागला नियाझोव - पानारिन याच्याविरुद्ध २१-१८, १६-२१, १९-२१ अशा पराभवास सामोरे जावे लागले. एम. आर. अर्जुन - ध्रुव कपिलाने निकिता ब्रगेन - खैतमुरत कुलमातोव यांना २१-१४, २१-८ असे हरवून भारताचा एकतर्फी विजय निश्‍चित केला.

'नो बॉल' संदर्भात आयसीसीचा मोठा निर्णय; वर्ल्डकपपासून होणार अंमलबजावणी!

चार वर्षांपूर्वी भारतीय पुरुष संघाने ब्राँझ जिंकले होते. त्यानंतरही या वेळच्या मूळच्या ड्रॉमध्ये भारताचा समावेश असलेल्या गटात गतविजेते इंडोनेशिया, तसेच फिलिपिन्स होते; मात्र चीन आणि हाँगकाँगला कोरोनामुळे माघार घ्यावी लागली आणि स्पर्धेचा ड्रॉ बदलला गेला. त्यामुळे आता भारताच्या गटात कझाकस्तान आणि मलेशियाच आहेत. भारताची गुरुवारी मलेशियाविरुद्ध लढत होईल. प्रत्येक गटातील दोन संघ बाद फेरीत खेळणार असल्यामुळे भारताची बाद फेरी आता जवळपास निश्‍चित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India wins the Asian Team Badminton Championship