'नो बॉल' संदर्भात आयसीसीचा मोठा निर्णय; वर्ल्डकपपासून होणार अंमलबजावणी!

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

एखाद्या सामन्यात नो बॉल पडण्याची टक्केवारी अत्यंत कमी असली तरी असे झाल्यास नो बॉलचा निर्णय देणे मैदानावरील पंचांसाठी अवघड असते.

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आता मोठ्या स्पर्धांमध्ये सामन्यातील प्रत्येक चेंडू नो बॉल आहे की नाही हे तपासणार आहे. 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या महिला टी-20 विश्वकरंडकात या यंत्रणेचा पहिल्यांदा वापर केला जाणार आहे.

 - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये या यंत्रणेची यशस्वी चाचणी घेण्यात आल्यानतंरच मोठ्या स्पर्धांमध्ये ही यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक चेंडूनंतर गोलंदाजाचा पाय क्रीझच्या पुढे पडला आहे का, हे तिसरा पंच तपासेल आणि एखादा चेंडू 'नो बॉल' असेल, तर तसे मैदानावरील पंचांना कळवेल.

- U19CWC Final : विजयाचा उन्माद बांगलादेशच्या अंगलट; खेळाडूंना भोगावी लागणार फळं!

या पद्धतीचा 'नो बॉल' यापुढे मैदानावरील पंचांनी देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिसर्‍या पंचांनीच तशी माहिती दिल्याशिवाय 'नो बॉल' देता येणार नाही. या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचे 'नो बॉल' देण्याचा अधिकार मैदानावरील पंचांनाच असेल. 

अशी झाली यंत्रणेची चाचणी :

खेळवले गेलेले सामने - 12
टाकले गेलेले चेंडू - 4717
टाकले गेलेले नो बॉल - 13

- डेव्हिड वॉर्नरला 'ऍलन बॉर्डर' तर एलिसे पेरीला 'बेलिंडा क्लार्क' पुरस्कार!

''मैदानावरील पंचांच्या निर्णयाला आणखी अचूक करणाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात क्रिकेट नेहमीच यशस्वी झाले आहे. ही यंत्रणा महिला टी20 विश्वकरंडकात नो बॉल जाहीर करण्याबाबतच्या चुका कमी करण्यात नक्कीच यशस्वी ठरेल,'' असा विश्वास आयसीसीचे सरव्यवस्थापक जोफ अॅलरडाईस यांनी व्यक्त केला.

- INDvsNZ:न्यूझीलंडकडून भारत चारीमुंड्या चीत; वन-डे सीरिजमध्ये व्हाईटवॉशची नामुष्की

ते म्हणाले, ''एखाद्या सामन्यात नो बॉल पडण्याची टक्केवारी अत्यंत कमी असली तरी असे झाल्यास नो बॉलचा निर्णय देणे मैदानावरील पंचांसाठी अवघड असते. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 2016मध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत या यंत्रणेची चाचणी झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत या यंत्रणेत बरेच बदल करण्यात आले आहेत आणि खेळात कमीतकमी अडथळा आणत या यंत्रणेची अंमलबजावणी केली जाईल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New no ball rule has apply from Womens World cup 2020 says ICC