भारताचा विजय पण फलंदाजीत निराशा!

Rohit and Virat
Rohit and Virat

लॉडरहिल, फ्लोरिडा : ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमध्ये विद्यमान विश्‍वविजेते असलेल्या वेस्ट इंडीजला शरण आणणारी कामगिरी गोलंदाजी केली, परंतु 96 धावांच्या माफक आव्हान पार करताना भारताच्या मधल्या फळीने निराशा केली. भारताने हा पहिला सामना चार विकेटने जिंकला. पदार्पणात तीन विकेट मिळवणाऱ्या नवदीप सैनीने वेस्ट इंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते. तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशानंतर आणि संघात दुफळी असल्याच्या अफवांनंतर भारतीय संघ प्रथमच मैदानात उतरला. ख्रिस गेल, आणि आंद्र रसेल अशा टी-20 स्पेशालिस्ट फलंदाजांच्या अनुपस्थितीत उतरणाऱ्या वेस्ट इंडीजला 20 षटकांत अवघ्या 95 धावात गुंडाळले त्यानंतर विजयी विजयाचे माफक लक्ष्य 17.2 षटकात पार केले. 

चेडूंपेक्षा कमी धावा करायच्या असल्यामुळे भारतीय फलंदाजीवर दडपण अजिबात नव्हते, पुनरागमन करणारा शिखर धवन अवघ्या एका धावेवर बाद झाली तरी चिंता नव्हती. रिषभ पंत आणि मनिष पांडे यांनी बेजबाबदार फटके मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून निराश केले. 

दोन चौकार, दोन षटकार मारून रोहित शर्मा सुनील नारायणच्या चेंडूवर बाद झाला. त्यावेळी विजयासाठी 64 धावांची गरज होती. संघ व्यवस्थापनाचा विश्‍वास अधिक पक्का करण्याची संधी असताना रिषभ पंतने पहिलाच चेंडू हवेत मारून विकेट गमावली. त्यानंतर मनिष पांडेने शानदार सुरुवात केली पण तोही गरज नसताना विकेट बहाल करून माघारी फिरला. 29 चेंडूत 19 धावा करणारा विराटही कमी वेगात आलेल्या चेंडूवर फसला. त्यानंतर विजय मिळवता मिळवता आठव्या फलंदाजालाही मैदानात यावे लागले. 

विंडीज सलामीवीरांचे भोपळे 
खेळपट्टी फलंदाजीस उपयुक्त असली तरी विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि नवा चेंडू ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरच्या हाती दिला त्याने दुसऱ्याच चेंडूवर जॉन कॅम्पबेलला बाद केले. लेगसाईडला सीमारेषेवर एकमेव क्षेत्ररक्षक असलेल्या कृणाल पंड्याचा दिशेने त्याने हा फटका मारला. त्यानंतरच्या षटकात भुवनेश्‍वर कुमारने एविन लुईसच्या यष्टीचा वेध घेतला अशा प्रकारे वेस्ट इंडीजचे दोन्ही सलामीवीर भोपळा न फोडता बाद झाले. 

सैनीचा भेदक मारा 
विश्‍वकरंडक स्पर्धेत प्रभाव पाडणाऱ्या निकोलस पुरनने सुंदरवर हल्ला करत आक्रमकता दाखवली त्यानंतर त्याने पदार्पण करणारा आणि ताशी 150 कि.मी. वेगवात चेंडू टाकण्याची क्षमता असलेल्या नवदीप सैनीचा दुसराच चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावला, पण सैनी भिरभिरला नाही नाही त्याने वेगवान आणि उसळत्या चेंडूवर पूरनला बाद केले त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हेटमायरचीही यष्टी भेदली. सैनीची ही स्वपनवर सुरुवात एकीकडे भारतीयांची पकड घट्ट करत होता तर खलील अहमद, कृणाल पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनीही आपल्या खात्यात विकेट जमा केल्या विंडीज फलंदाजांमध्ये ड्रेसिंगरुममध्ये परतण्याची घाई सुरु झाली. मात्र दुसऱ्या बाजूने किएरॉन पोलार्ड किल्ला लढवत होता. त्याने 49 धावा केल्या पण अखेरच्या चेंडूवर सैनीने त्याला बाद करून आपला तिसरा बळी मिळवला. 

संक्षिप्त धावफलक 
वेस्ट इंडीज : 20 षटकांत 9 बाद 95 (निकोलस पूरन 20 -16 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, किएरॉन पोलार्ड 49 -49 चेंडू, 2 चौकार, 4 षटकार, भुवनेश्‍वर कुमार 4-0-19-2, नवदीप सैनी 4-1-17-3, खलील अहमद 2-0-8-1, कृणाल पंड्या 4-1-20-1, रवींद्र जडेजा 4-1-13-1) पराभूत वि. भारत 17.2 षटकांत 6 बाद 98 (रोहित शर्मा 24 -25 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार, विराट कोहली 19 -29 चेंडू, 1 चौकार, मनिष पांडे 19 -14 चेंडू, 2 चौकार, कॉट्रेल 4-0-20-2, सुनील नारायण 4-0-14-2, किमो पॉल 3.2-0-23-2)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com