भारतीय बॅडमिंटनचे सध्या सुवर्णयुग - नंदू नाटेकर

वृत्तसंस्था
सोमवार, 14 मे 2018

मी कधीही कोणाकडे शिकलो नाही. दुसऱ्यांचा खेळ पाहून शिकत गेलो. खेळ बघत राहिल्याचा खूप फायदा होतो. पद्म पुरस्काराने गौरव झाला नाही, याचा मी कधी विचारही केला नाही. सामनाही संपल्यानंतर लगेच विसरत असे आणि संगीताचा आनंद घेत असे. 
- नंदू नाटेकर

मुंबई -भारतीय बॅडमिंटनचे सध्या सुवर्णयुग सुरू आहे. विजेतेपद जिंकणारे खेळाडू चीन, थायलंड, मलेशियाचेच नव्हेत, तर भारतीयही आहेत, हे पाहून खूपच आनंद होतो, असे मत दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांनी व्यक्त केले. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होणारे भारतीय बॅडमिंटनपटू नक्कीच कौतुकास पात्र आहेत, असे मत नाटेकर यांनी व्यक्त केले. नाटेकर यांनी शनिवारी 85 व्या वर्षात पदार्पण केले, त्याबद्दल लीजंड्‌स क्‍लबच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. 

नाटेकर हे भारताबाहेर विजेतेपद जिकणारे पहिले बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी हा पराक्रम 1956 मध्ये केला होता. त्यांनाही पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवालची तुलना करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी सिंधू उंचीचा पुरेपूर फायदा घेते, तर साईना चांगली लढवय्यी असल्याचे सांगितले. त्यांनी किदांबी श्रीकांत हा क्‍लास प्लेयर असल्याचेही नमूद केले. 

नाटेकर हे 1954 मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धा खेळले होते. त्यावेळी त्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. बॅडमिंटन खूप वेगवान झाले आहे, तसेच तंदुरुस्तीही महत्त्वाची ठरत आहे, याकडे लक्ष वेधले. त्यांनी माजी ऑल इंग्लंड विजेता वॉंग पेंग सून हा सामना संपल्यानंतर मैदानास पाच फेऱ्या मारत असे, मला एकही जमली नव्हती, असेही हसत हसत सांगितले. 

मी कधीही कोणाकडे शिकलो नाही. दुसऱ्यांचा खेळ पाहून शिकत गेलो. खेळ बघत राहिल्याचा खूप फायदा होतो. पद्म पुरस्काराने गौरव झाला नाही, याचा मी कधी विचारही केला नाही. सामनाही संपल्यानंतर लगेच विसरत असे आणि संगीताचा आनंद घेत असे. 
- नंदू नाटेकर 

सुरेश गोयल आणि नंदू नाटेकर यांच्यातील लढत एक जुगलबंदीच असे. नाटेकर शॉट्‌सचा अंदाज घेण्यात वाक्‌बगार होते. नाटेकर यांनी खेळलेले शॉट्‌स काही वेळातच गोयल खेळत असल्याचा अनुभव लाभत असे. नाटेकर आणि राजीव बग्गा सोडल्यास महाराष्ट्रात पुरुष एकेरी विजेता झाला नाही, याची खंत वाटते. 
- अनिल प्रधान, दिग्गज बॅडमिंटन मार्गदर्शक 

 

Web Title: for Indian Badminton Golden time now - Nandu Natekar