INDvBAN : ईडन गार्डनवरील ऐतिहासिक कसोटीचा पहिला दिवस भारतीयांचा!

IND-BAN-Eden-Garden
IND-BAN-Eden-Garden

कोलकता : भारतात शुक्रवारी (ता.22) सुरू झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्यात सांजवेळ आव्हानात्मक वाटत होती. मात्र, सांजवेळ येण्यापूर्वीच भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या बांगलादेशचा डाव 106 धावांत गुंडाळला.

त्यानंतर भारताने याच सांजवेळेच्या आव्हानाचा सामना करत दिवस अखेरपर्यंत 3 बाद 174 धावांपर्यंत मजल मारली होती. क्रिकेट तसे क्रीडा विश्‍वातील भारतीय दिग्गजांबरोबर राजकीय क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत या ऐतिहासिक दिवस-रात्र सामन्याला सुरवात झाली. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा हट्ट बांगलादेश संघाने सोडला नाही. मग काय व्हायचे तेच झाले. क्रिकेट विश्‍वात आता दहशत निर्माण करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांनी फलंदाजांना हादरवून सोडले आणि बांगलादेशचा डाव अवघ्या 31 षटकांतच संपुष्टात आणला. भारताकडून ईशांत शर्माने 5, उमेश यादवने 3, तर महंमद शमीने दोन गडी बाद केले.

त्यानंतर भारतीय फलंदाजांनी दिवस अखेरपर्यंत पहिल्याच दिवसअखेरीस 68 धावांची आघाडी घेत आपले वर्चस्व सिद्ध केले. खेळ थांबला तेव्हा कर्णधार विराट कोहली 59 आणि अजिंक्‍य रहाणे 23 धावांवर खेळत होता. कोहली आणि पुजारा यांची अर्धशतकी खेळी भारताच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य ठरली. कोहलीने या खेळीत कर्णधार म्हणून सर्वांत वेगवान पाच हजार धावा पूर्ण केल्या. 

बांगलादेशचा कर्णधार मोमीनुलने नाणेफेक जिंकली आणि परत एकदा फलंदाजी करायचा धाडसी निर्णय घेतला. शादमन इस्लामने दोन कडकडीत चौकार मारून जमा झालेल्या अंदाजे 70 हजार प्रेक्षकांना घसे साफ करायला लावले. ईशांत शर्माने इमरूल कयासला पायचित करून पहिले यश मिळवले. मग उमेश यादवलाही सूर गवसला. त्याने कर्णधार मोमीनुल आणि महंमद मिथुनला पाठोपाठ बाद करून धमाल उडवली. मोमीनुल हकचा रोहित शर्माने उजवीकडे झेपावत एका हातात पकडलेला झेल प्रेक्षणीय होता. 

दोन साथीदार धमाल उडवत असताना महंमद शमी मागे कसा राहील. त्याने सर्वांत महत्त्वाची म्हणजे मुश्‍फीकूर रहीमची विकेट काढली. तीन मुख्य फलंदाज शून्यावर बाद झाल्याने बांगलादेशच्या डावाला असह्य हादरे बसले. चांगली फलंदाजी करणाऱ्या शादमनला उमेश यादवने बाद केले. दुसरा अनुभवी फलंदाज मेहमदुल्लाला बाद करताना वृद्धिमान साहाने पकडलेला झेल जमिनीपासून एक इंचावर होता.

तळात लीटन दास चांगली फलंदाजी करू लागला असताना शमीचा बाउन्सर दासला डोक्‍यावर लागला आणि तो उपहारानंतर फलंदाजीला आला नाही. नईम हसनने थोडा प्रतिकार केल्याने बांगलादेशने धावसंख्येची शंभरी तरी ओलांडली. ईशांत शर्माने तळातील फलंदाजांना विकेटवर उभे राहू दिले नाही. 31व्या षटकात बांगलादेशचा डाव 106 धावांवर आटोपला. 

भारतीय फलंदाजीच्या सुरवातीला गेल्या सामन्यातील द्विशतकवीर मयांक आगरवाल आश्‍चर्यकारकरीत्या लवकर बाद झाला. संध्याकाळी 5 नंतर अजून प्रेक्षागृह भरले. कारण, ऑफिसचे काम संपवून काही प्रेक्षक पहिल्या पिंक बॉलचा कसोटी सामना बघायला ईडन गार्डनवर आले. नव्या चेंडूवर मारा करणारे दोनही गोलंदाज त्यामानाने खूपच कमी वेगाने चेंडू टाकत होते.

संयम दाखवत फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला 12 धावांवर खेळत असताना अल-अमीन हुसेनने अगदीच सोपा झेल सोडून जीवदान दिले आणि गोलंदाज अबू जायेदने कपाळावर हात मारून घेतला. पण, त्याला याचा फायदा उठवता आला नाही. मयांकप्रमाणेच तो देखील झटपट बाद झाला. या वेळी चेतेश्‍वर पुजारा आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दिवस अखेरपर्यंत कोहलीने उपकर्णधार रहाणेला साथीला घेत भारताचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com