esakal | INDvsNZ: पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात भारताचा 80 धावांनी दारुण पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

newzealand

INDvsNZ: पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात भारताचा 80 धावांनी दारुण पराभव

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वेलिंग्टन : जगातील सर्वोत्तम बॅटिंग लाईनअप असणाऱ्या भारतीय फलंदाजांनी पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात पूर्ण निराशा केली. न्यूझीलंडने सर्वोत्तम सांघिक खेळाच्या जोरावर भारताचा 80 धावांनी विजय मिळविला. 

सलामीवीर कॉलीन मुन्रो आणि टीम सीफर्ट यांनी सुरवातीपासूनच वाढवलेला धावांचा वेग आणि त्यानंतर कर्णधार केन विल्यम्सन आणि अखेरच्या षटकात स्कॉट कुगलेजिनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर किवींनी भारतासमोर 220 धावांचे आव्हान ठेवले. 

भारतीय फलंदाजीची खोली पाहता हे आव्हान काही फार अवघड नव्हते. मात्र, भारतीय फलंदाजांनी स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. टीम साउथीने दुसऱ्याच षटकात भारताला पहिला झटका दिला. त्याने कर्णधार रोहित शर्माला केवळ एका धावेवर बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजय शंकरने पाचव्या षटकात कुगलेजिनला सलग दोन चौकार आणि एक षटकार खेचला. 

शिखर धवन 28 धावा करुन बाद झाला. नवव्या षटकात दोन बाद 64 अशी धावसंख्या असताना सँटनरने एकाच षटकात पंत आणि शंकरला बाद केले आणि भारताची चार बाद 65 अशी बिकट परिस्थिती झाली. ट्वेंटी20मध्ये पंतला खेळवावे असे अनेक माजी खेळाडूंचे मत होते. पंतला मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयश आले.  

अडचणीच्या काळात धावून येणारा धोनी एकाकी झुंज देऊ लागला. दुसऱ्या बाजूने कार्तिक, पंड्या बंधू आणि भुवनेश्वर कुमार बाद झाले आणि भारताचा पराभव निश्चित झाला. 20 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चहल बाद झाला आणि भारताचा डाव संपुष्टात आला.

loading image