
Football : भारतीय फुटबॉलमध्येही आता ‘वार’ तंत्रज्ञानाचा वापर होणार
नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या फुटबॉल सामन्यांमध्येसुद्धा आता ‘वार’ चा (व्हिडीओ असिस्टंन्ट रेफ्री) वापर करण्यात येणार आहे. भारतात पुढच्या मोसमपासून सुरू होणाऱ्या फुटबॉल स्पर्धांच्या सामन्यांमध्ये वार या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष कल्याण चौबे यांनी दिली आहे.
कल्याण चौबे सध्या बेल्जियमच्या दौऱ्यावर असून, त्या देशामधील स्थानिक स्पर्धांमध्ये सुद्धा वारच्या होणाऱ्या वापरानंतर भारतातसुद्धा असे तंत्रज्ञान पुढील फुटबॉल मोसमपासून वापरात आणणार असल्याचे म्हटले आहे.
‘वारच्या वापरामुळे फुटबॉलच्या लढतींमध्ये मैदानावरील रेफ्रींकडून होणाऱ्या चुका यामुळे दुरुस्त करता येणार आहेत. सामन्यांमध्ये कमीत कमी त्रुटी राहाव्यात म्हणून फुटबॉल संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी पुढील फुटबॉल मोसमापासून वारचा वापर करण्यास सुरुवात करणार आहे,’ अशी माहिती कल्याण चौबे यांनी दिली.