विश्वकरंडक वर्चस्व राखण्याची भारतीय नेमबाजांना संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

विश्वकरंडक नेमबाजी अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत भारताचेच नव्हे; तर जगातील आघाडीचे नेमबाज आपले कसब पणास लावतील. अर्थात मोसम संपत असताना सर्वोत्तम नेमबाजात होणारी ही स्पर्धा कस पणास लावेल; पण त्याच वेळी यातून ऑलिंपिक पात्रता नसल्यामुळे नेमबाजांवर दडपणही नसेल.

मुंबई : विश्वकरंडक नेमबाजी अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत भारताचेच नव्हे; तर जगातील आघाडीचे नेमबाज आपले कसब पणास लावतील. अर्थात मोसम संपत असताना सर्वोत्तम नेमबाजात होणारी ही स्पर्धा कस पणास लावेल; पण त्याच वेळी यातून ऑलिंपिक पात्रता नसल्यामुळे नेमबाजांवर दडपणही नसेल.

भारताने या वर्षातील चारही विश्वकरंडक स्पर्धात आघाडी राखली. आता याच स्पर्धेतील अव्वल नेमबाज चीनमधील या स्पर्धेत असतील. त्यामुळे भारताचे 14 नेमबाज 19 प्रकारात भारताचे आव्हान निर्माण करतील. आशियाई स्पर्धेपाठोपाठ होत असलेल्या या स्पर्धेसाठी सर्वच नेमबाजांची पूर्वतयारी किती असेल हा प्रश्न आहे. भारताने पिस्तूल, रायफल प्रकाराच्या विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक 16 सुवर्णपदके जिंकली आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील चीनची केवळ 8 सुवर्णपदके आहेत, त्यावरुन भारतीय हुकुमत लक्षात येईल.

पहिल्या दिवशी पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनची स्पर्धा आहे. त्यात पुरुषांच्या स्पर्धेसाठी संजीव राजपूत आणि अखिल शेरॉन; तर महिलांच्या स्पर्धेसाठी अंजुम मौदगिल पात्र ठरली आहे. दहा मीटर एअर रायफलसाठी भारताच्या चौघी पात्र ठरल्या आहेत. त्यात अंजुम, अपूर्वी चंडेला, एल्वानेल आणि मेहुली घोष असतील. आता जगातील अव्वल नेमबाजांचाच केवळ सामना करताना भारतीय कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.

चीनमधील या स्पर्धेस ऑलिंपिकची रंगीत तालीम असे एकप्रकारे म्हणता येईल. मात्र त्याच वेळी ऑलिंपिक पात्रतेचे कोणतेही दडपण नेमबाजांवर नसेल, त्यामुळे ते मुक्तपणे नेमबाजी करू शकतील. नेमबाजांची नक्कीच स्वतःबरोबर चुरस या स्पर्धेत असेल; पण कमालीची कडवी चुरस नसेल. या स्पर्धेत विश्वकरंडक स्पर्धेचा धडाका कायम राहील हीच अपेक्षा असेल.
- दीपाली देशपांडे, भारतीय संघाच्या मार्गदर्शक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian shooters hope to dominate in world cup finals