esakal | इंग्लंडची टीम बदलली, पण टीम इंडियाची सुट्टी जैसे थे!
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Cricketer

इंग्लंडची टीम बदलली, पण टीम इंडियाची सुट्टी जैसे थे!

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंड क्रिकेट संघातील काही खेळाडू आणि स्टाफ मेंबर्संना कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी समोर आलेल्या कोरोनाच्या खळबळजनक वृत्तानंतर इंग्लंडने पाकिस्तान विरुद्धच्या वनडे आणि टी-20 साठी बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या संघाची घोषणा केलीय. दुसरीकडे याचवेळी भारतीय संघ हा देखील इंग्लंडमध्येच आहे. इंग्लंडच्या ताफ्यात झालेल्या कोरोनाचा उद्रेकाचा भारत-इंग्लंड कसोटी मालिकेवर परिणाम होण्याती भीतीही निर्माण झालीये. (Indian teams break in UK to continue after despite England teams COVID 19 scare)

इंग्लंडच्या ताफ्यात खळबळ माजली असली तरीही भारतीय संघातील सदस्यांच्या ठरलेल्या सुट्टीमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असे समोर येत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेला मैदानात उतरण्यापूर्वी भारतीय संघातील सदस्यांना 20 दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. याकाळात त्यांच्यावरील बायोबबलचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. संघातील बहुतांश खेळाडू लंडनच्या आसपास सुट्टीचा आनंद घेत आहेत. काही खेळाडू इंग्लंडमधील खेड्यापाड्यांची सैरही करताना दिसत आहेत.

हेही वाचा: इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाचा दुसऱ्या डोसचा प्लॅन ठरला!

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर 48 तासांनी इंग्लंडच्या खेळाडूंची कोरोना टेस्ट झाली. यात 3 खेळाडूंसह अन्य चार स्टाफ सदस्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यांच्यासह संपर्कातील खेळाडूंनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स बोर्डाने दुसरी टीम घोषित केलीय. कोरोनाच्या धास्तीनंतर एवढा मोठा बदल इंग्लंड बोर्डाने केला असला तरी अद्याप यासर्व प्रकारामुळे भारतीय संघाच्या कार्यक्रमात कोणताही बदल झाला नसल्याचे समजते.

हेही वाचा: ENGvsPAK : इंग्लंडच्या ताफ्यातील 7 जणांना कोरोना

भारतीय क्रिकेट नियमामक मंडळाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या परिस्थितीची आम्हाला कल्पना आहे. इंग्लंड आणि वेल्स बोर्डाने आरोग्य सुरक्षिततेच्या बाबती नियमामध्ये काही बदल केला तर आम्ही त्याचे पालन करु. सध्याच्या घडीला आम्हाला तशी कोणतीही सूचना मिळालेली नाही. खेळाडूंना दिलेला ब्रेक कायम आहे. लंडनमध्ये खेळाडू एकत्र आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात येईल. त्यानंतरच ते बायोबबलमध्ये प्रवेश करतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय खेळाडू 14 जुलैला लंडनमध्ये पुन्हा एकत्र जमणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ दोन आठवड्यांचा सराव शिबीर आणि काउंटी इलेव्हन विरुद्ध प्रथम श्रेणी मॅचसाठी मैदानात उतरतील. इंग्लंड दौऱ्याला जाण्यापूर्वी भारतीय संघातील सदस्यांनी कोरोनाचा लशीचा पहिला डोस घेतला होता. इंग्लंडमध्ये त्यांच्या दुसऱ्या डोसचीही व्यवस्था करण्यात आलीये. 7 आणि 9 जूलै रोजी टीम इंडियातील सदस्यांना कोरोना लशीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

loading image