आशियाई टेबल टेनिसमध्ये भारत उपांत्यपूर्व फेरीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

भारताच्या पुरुष संघाने आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताची आता लढत बलाढ्य जपानविरुद्ध होईल. महिला संघ थायलंडविरुद्ध पराभूत झाला आणि ते आता नवव्या क्रमांकासाठी खेळणार आहेत.

मुंबई : भारताच्या पुरुष संघाने आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताची आता लढत बलाढ्य जपानविरुद्ध होईल. महिला संघ थायलंडविरुद्ध पराभूत झाला आणि ते आता नवव्या क्रमांकासाठी खेळणार आहेत.

भारताने गटसाखळीत कुवेत, तसेच श्रीलंकेचा 3-0 असा पाडाव केला आणि प्रथम विभागीय साखळीत प्रवेश केला. या गटात भारताने सौदी अरेबियाचा 3-1 आणि थायलंडचा 3-0 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी निश्‍चित केली आहे. भारताची स्पर्धेच्या प्रथम श्रेणी विभागातील आगामी लढत उत्तर कोरियाविरुद्ध आहे. मात्र या लढतीपूर्वीच चॅम्पियन्स विभागाची उपांत्यपूर्व फेरी निश्‍चित केली आहे. भारतीय संघाने ही कामगिरी सलग दुसऱ्या वर्षी केली आहे.

थायलंडविरुद्धच्या लढतीत शरथ कमलने पहिला गेम गमावल्यानंतर बाजी मारली, पण त्याच्या खेळात पुरेसे सातत्य नव्हते. जी. साथीयनचा खेळ पहिला गेम गमावल्यावर जास्त बहरला. हरमीत देसाईने 1-2 पिछाडीनंतर विजय खेचून आणला.

भारतीय महिला संघाने प्राथमिक साखळीत लेबनॉन, तसेच जॉर्डनला 3-0 असे हरवले. त्यानंतरच्या प्रथम श्रेणीच्या साखळीत उझबेकिस्तानला हरवल्यानंतर थायलंडविरुद्ध हार पत्करली, त्यामुळे आता भारतीय महिला संघ मलेशियाविरुद्ध नवव्या क्रमांकासाठी खेळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian tt team enters quarter finals in asian championship