भारतीय महिला विजयासाठी उत्सुक 

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जुलै 2018

विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडवर सनसनाटी विजय नोंदविण्याची संधी हुकल्यानंतर आता भारतीय महिला उद्या आयर्लंडविरुद्ध पहिल्या विजयासाठी उत्सुक असतील. 

लंडन - विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडवर सनसनाटी विजय नोंदविण्याची संधी हुकल्यानंतर आता भारतीय महिला उद्या आयर्लंडविरुद्ध पहिल्या विजयासाठी उत्सुक असतील. 

पहिल्याच सामन्यात भारताला इंग्लंडवर विजय करण्याची संधी होती. मात्र, या सामन्यात भारताला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. सामन्यात 54 मिनिटे आघाडी राखल्यानंतर अगदी अखेरच्या क्षणी स्वीकारलेल्या गोलमुळे भारताला बचावाच्या आघाडीवर गांभीर्याने विचार करावा लागेल. 

जागतिक क्रमवारीत भारतीय संघ आयर्लंडपेक्षा वर असला, तरी त्यांनी कमी लेखण्याची चूक प्रशिक्षक शूअर्ड मरिने आपल्या खेळाडूंना करून देणार नाहीत. पहिल्या सामन्यात अमेरिकेवर विजय मिळवून आयर्लंड सध्या "ब' गटात आघाडीवर आहेत याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापनाला नियोजन आखताना करावा लागेल, यात शंकाच नाही. 

निसटता विजय मिळविला तरी आयर्लंडचे बाद फेरीतील स्थान निश्‍चित होईल. त्याचवेळी पहिला विजय मिळवून भारतीय संघ आव्हान राखण्यासाठी प्रयत्नशील राहील. गेल्यावर्षी हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरीच्या स्पर्धेत भारताला याच संघाकडून पराभव पत्कारावा लागला होता. या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय महिलांना साधायची आहे. भारताची गोलरक्षक सविता म्हणाली, ""आम्ही आयर्लंडविरुद्ध हरलो होता हा इतिहास झाला. आमची आता तयारी चांगली झाली आहे. सराव सामन्यात त्यांच्याविरुद्ध आम्ही चांगला खेळ केला आहे. इंग्लंडविरुद्ध आम्ही चांगलाच खेळ केला. मात्र, पेनल्टी कॉर्नरवर स्वीकारलेले गोल भारताला महागात पडले. आम्ही सध्या आक्रमक आणि बचाव अशा दोन्ही आघाडीवर खेळत आहोत. त्यामुळे आमचा संघ भक्कम दिसून येतोयं.'' 

इंग्लंडविरुद्ध भारताने आघाडी घेतली असली, तरी त्यांना आपला खेळ उंचावण्यात आलेले अपयश हे त्यांच्या पराभवाचे कारण होते. या सामन्यात भारतीय महिला एकही कॉर्नर मिळवू शकल्या नव्हत्या. त्यामुळे ड्रॅग फ्लिकर गुरजित कौर निराश झाली होती. मैदानातील खेळाला आता कॉर्नरची जोड मिळाल्यास भारताची बाजू अधिक बळकट होईल. 

या सामन्यातील विजयाने भारताला गटात अव्वल स्थान मिळवून बाद फेरीतील स्थान भक्कम करता येणार आहे. त्यामुळे आता नाही, तर नंतर कधीच नाही याच विचाराने भारतीय महिलांना मैदानात उतरावे लागेल. 

दरम्यान, स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात उद्या "क' गटात स्पेनची लढत दक्षिण आफ्रिकेशी पडणार आहे.

Web Title: Indian women are keen to win