INDvBAN : श्रेयस-राहुलच्या अर्धशतकांमुळे आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश; बांगलादेशपुढे 175 धावांचे लक्ष्य!

Rahul-Shreyas-IND
Rahul-Shreyas-IND

नागपूर : मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी झळकाविलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला रविवारी तिसऱ्या निर्णायक टी 20 सामन्यात बांगलादेशासमोर 175 धावांचे जगडे आव्हान ठेवता आले. 

प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 बाद 174 धावा केल्या. लोकेश राहुलने 52 धावांचे योगदान दिले, तर अर्धशतकी खेळी करताना अय्यरने केलेली फटकेबाजी निर्णायक ठरली. त्याने 33 चेंडूंत 3 चौकार, 5 षटकारांसह 62 धावांची खेळी केली. अखेरच्या टप्प्यात मनिष पांडेने देखील आक्रमक पवित्रा घेतल्याने भारताचे आव्हान भक्कम झाले. 

नाणेफेक जिंकून बांगलादेश कर्णधार महमुदुल्ला याने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. महुमुदुल्लाचा निर्णय सुरवातीला चांगलाच यशस्वी ठरला. सैफुल इस्लाम याने पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर भारताचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले. त्यानंतर त्याने धोकादायक ठरणाऱ्या शिखर धवनचाही अडसर दूर केला. सहा षटकांतच भारताने सलामीची जोडी गमाविली होती. त्या वेळी एकत्र आलेल्या लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर जोडीने नंतर भारताच्या डावाला आकार दिला. 

या जोडीने स्थिरावण्यासाठी वेळ घेतला खरा, पण परिस्थिती आणि षटकांचे भान ठेवून त्यांनी टॉप गियरमध्ये येण्यास वेळ घेतला नाही. या दोघांमध्ये श्रेयस अधिक आक्रमक राहिला. त्याने बांगलादेशाच्या गोलंदाजांना उचलून मारण्याचे धाडस केले आणि धावांना वेग दिला. या जोडीने 5 षटकांतच 59 धावांची भागीदारी केली. त्या वेळी राहुल बाद झाला.

राहुल बाद झाल्यानंतर खेळायला आलेल्या रिषभ पंतला पुन्हा एकदा संधीचा फायदा उठवता आला नाही. अय्यरला तो साथ देऊ शकला नाही. सौम्या सारकराने त्याचा त्रिफळा उडविला. दुसऱ्या बाजूने अय्यरने आपल्या फटकेबाजीने डाव लावून धरला होता. मात्र, पंत पाठोपाठ तो देखिल सौम्याची शिकार ठरला. पण, संधी मिळालेल्या मनिष पांडेने फटकेबाजी करून भारताचे आव्हान भक्कम होईल याची काळजी घेतली. अखेरच्या तीन षटकांत त्याने शिवम दुबेच्या साथीत 30 धावा कुटल्या. 

संक्षिप्त धावफलक :
भारत 20 षटकांत 5 बाद 176 (श्रेयस अय्यर 62 -33 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार, लोकेश राहुल 52 - 35 चेंडू, 7 चौकार, मनिष पांडे नाबाद 22, सौम्या सरकार 2-29, सैफूल इस्लाम 2-32)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com