INDvSA : रोहितच्या द्विशतकी, रहाणेच्या शतकी खेळीमुळे आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर

IND-Rohit-Ajinkya
IND-Rohit-Ajinkya

रांची : रोहित शर्माचे द्विशतक आणि अजिंक्‍य रहाणेच्या शतकाने भारतीय संघाला रांची कसोटीतही 9 बाद 497 धावांचा डोंगर उभा करता आला. कसोटी कारकिर्दीतील आपले पहिले द्विशतक झळकावताना रोहित शर्माने एका मालिकेत सर्वाधिक षटकार मारायचा विक्रमही सहजी मागे टाकला.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे थकलेल्या अवस्थेत फलंदाजीला पाचारण केल्यावर दक्षिण आफ्रिकेचे 2 प्रमुख फलंदाज पाठोपाठ तंबूत परतले. खराब प्रकाशामुळे खेळ थांबवला गेला. दक्षिण आफ्रिका संघ धावांच्या दडपणाखाली दबून गेल्याचे चित्र होते. त्यांनी दिवस अखेरीस 2 बाद 9 अशी मजल मारली होती. 

दुसऱ्या दिवशीच्या खेळास रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे या नाबाद फलंदाजांनी आत्मविश्‍वासाने सुरुवात केली. रोहित शर्माने राखलेली आक्रमकता विशेष होती. त्याने गोलंदाजाला एका षटकांत किमान दोन चौकार मारताना भारताच्या धावगतीला वेग दिला. खास करून लुंगी एन्गीडीला रोहित शर्माने मारलेले फटके लाजवाब होते. अजिंक्‍य रहाणेनेदेखील सहज फलंदाजी करून मायदेशातील शतकाचे ग्रहण सोडवले.

रोहितपासून प्रेरणा घेत दमदार वाटचाल करत रहाणेने शतक पूर्ण केले, तेव्हा रोहित शर्माने रहाणेला मिठी मारून पाठीवर गुद्दे मारत त्याचे कौतुक केले. पण, शतकानंतर रहाणेची एकाग्रता भंग पावली आणि लींडला पहिला कसोटी बळी मिळाला. अजिंक्‍य रहाणे 17 चौकार आणि एक षटकारासह 115 धावा करून बाद झाला. रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे दरम्यान 267 धावांची भलीमोठी भागीदारी झाली. 

पहिल्या दोन तासात भारतीय फलंदाजांनी 127 धावांची भर घातली होती आणि रोहित शर्मा 199 धावांवर नाबाद परतला होता. उपाहारानंतर रोहित शर्माने जणू वीरेंद्र सेहवागला वाढदिवसाची भेट दिली. सेहवागने पहिले त्रिशतक ठोकताना शतक आणि द्विशतकीय मजल षटकार मारून केली होती, तशीच वाटचाल रोहितची होती. शतक षटकार मारून पूर्ण करणाऱ्या रोहित शर्माने द्विशतकही पुलचा खणखणीत षटकार मारून केले. एकाच कसोटी मालिकेत 3 किंवा जास्त शतके करणारा रोहित शर्मा विराट कोहली आणि सुनील गावसकरांच्या रांगेत जाऊन बसला. 

रोहित 212 धावा करून रबाडाच्या आपटलेल्या चेंडूवर षटकार मारायच्या प्रयत्नात एन्गीडीकडे झेल देऊन बाद झाला. पहिल्या दिवशी पावसाने भरपूर खेळ वाया गेल्याने दुसऱ्या दिवशी तो वेळ भरून काढायला उपहार ते चहापानाची वेळ अर्धा तासाने वाढवण्यात आली होती. भारतीय फलंदाजांनी त्याचा फायदा घेत धावसंख्या 9 बाद 497 वर नेऊन ठेवली. दमलेल्या आणि लय हरवून बसलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर रवींद्र जडेजानेही अर्धशतक ठोकून घेतले. इतकेच काय उमेश यादवने सणसणीत 5 षटकार मारून हात धुऊन घेतले. साडेचार तासांच्या खेळात भारतीय संघाने 273 धावांची भर घातली. जॉर्ज लींडने चार फलंदाजांना बाद करून त्यातल्या त्यात चमक दाखवली. 

चहापानाच्या सुमारासच विराट कोहलीने भारताचा पहिला डाव घोषित केला. दीड दिवस अथक मैदानावर राहणाऱ्या दक्षिण आफ्रिका डावाची सुरवात व्हायची तशीच झाली. त्यांच्या डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर महंमद शमीने डीन एल्गरला झेलबाद करवले. दुसऱ्याच षटकात उमेश यादवने क्वींटन डिकॉकला बाद केले. दोनही झेल यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने पकडले. दक्षिण आफ्रिका संघ 2 बाद 9 अशा नाजूक अवस्थेत असताना खेळ पहिल्या दिवसाप्रमाणे अपुऱ्या प्रकाशामुळे थांबविण्यात आला. तेव्हा झुबेर हमजा आणि कर्णधार फाफ डू प्लेसी खेळपट्टीवर नाबाद होते. 

संक्षिप्त धावफलक :-

भारत 116.3 षटकांत 9 बाद 497 घोषित (रोहित शर्मा 212 -255 चेंडू, 28 चौकार, 6 षटकार, अजिंक्‍य रहाणे 115 - 192 चेंडू, 17 चौकार, 1 षटकार, रवींद्र जडेजा 51, उमेश यादव 31 -10 चेंडू, 5 षटकार, जॉर्ज लिंडे 31-2-133-4, कागिसो रबाडा 23-7-85-3, नॉर्टिये 1-79, पिएड्‌ट 1-101)

दक्षिण आफ्रिका 5 षटकांत 2 बाद 9 ( झुबेर हमजा खेळत आहे 0, फाफ डू प्लेसी खेळत आहे 1, शमी 1-1-0-1, उमेश यादव 1-0-4-1)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com