Lendl-Simmons
Lendl-Simmons

INDvWI : सिमन्सने भारताचा विजयी रथ रोखला; मालिकेत 1-1 बरोबरी!

तिरुअनंतपुरम : शिवम दुबेने किएरॉन पोलार्डच्या एकाच षटकात तीन षटकार लगावले तसेच तुफानी अर्धशतक केले; पण खराब क्षेत्ररक्षणाने मुंबईकर नवोदित फलंदाजांच्या अविस्मरणीय कामगिरीवर अक्षरशः पाणी पडले. त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्ध सलग आठव्या विजयाचे लक्ष्य बाळगलेल्या भारताची मालिका खंडित झाली. दुसऱ्या टी-20 सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवत वेस्ट इंडिजने मालिका 1-1 अशी बरोबरी साधली.  

विंडीजचे सलामीवीर लेंडल सिमन्स आणि एविन लुईस यांनी पहिल्या चेंडूपासूनच सामना जिंकण्याच्या दृष्टीने खेळी केली. या दोघांनी 73 धावांची सलामी दिली. सिमन्सने 67 धावांची अर्धशतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला लुईस, हेटमायर आणि पूरन यांनी चांगली साथ दिली. 8 विकेट्सने विजय मिळवत वेस्ट इंडिजने मालिका विजयाचे भारताचे स्वप्न पुढे ढकलले.

दरम्यान, विराट कोहलीने शिवमला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिल्यावर अनेकांच्या भुवया वक्रावल्या होत्या; पण काहीशी सावध सुरुवात केलेल्या शिवमने जम बसल्यावर विंडीज गोलंदाजीवर तुफानी हल्ला केला. त्यानंतर पंतने अखेरच्या षटकात धावगतीस वेग दिला. त्यामुळे मधली फळी कोलमडल्यावरही भारताने पावणेदोनशेची मजल मारली. अर्थात याचे संरक्षण करण्यात भारतीय कमी पडले.

वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर व रिषभ पंतने सोडलेल्या झेलाने तसेच खराब क्षेत्ररक्षणाने भारताने जणू पराभव ओढवूनच घेतला. रवींद्र जडेजाकडून धावा रोखतानाही चूक झाली. सलामीच्या सामन्यातही भारताच्या खराब क्षेत्ररक्षणाने विंडीजने द्विशतकी मजल मारली होती; पण विराट कोहलीच्या आक्रमक फलंदाजीने विजय मिळाला होता; पण या वेळी अपयशच पदरी आले. 

सुरवातीला जम बसेल असे वाटत असतानाच सलामीचे फलंदाज परतल्यावर मैदानात आलेल्या शिवमने जम बसवला आणि विंडीज गोलंदाजांना लक्ष्य केले. त्याने पोलार्डच्या एका षटकात तीन उत्तुंग षटकारांसह 26 (तीन वाईड) धावा वसूल केल्या. शिवमची आतषबाजी पाहिल्यावर फलंदाजी किती सोपी आहे, असे वाटत होते; पण शिवम आणि रिषभ पंत सोडल्यास भारताच्या एकाही फलंदाजास पाव शतक करता आले नाही. त्यावरून फलंदाजी सोपी नव्हती, हे लक्षात येते.

भारतीय डाव सुरू असताना खेळपट्टी नक्कीच फिरकीस काहीशी साथ देत होती. त्यामुळेच विंडीजचे फिरकी गोलंदाज प्रभावी ठरले. अर्थात शिवमच्या ताकदवान फलंदाजीमुळेच भारतास चांगले आव्हान निर्माण करता आले होते; मात्र विंडीजने भारतीयांच्या निष्प्रभ गोलंदाजीचा समाचार घेताना 11 चौकार आणि 12 षटकारांची आतषबाजी केली आणि हे आव्हान खूपच तोकडे असल्याचे दाखवले. 

शिवम दुबेची कामगिरी :-  
- शिवम दुबेचे एकाच षटकात तीन षटकार 
- देशांतर्गत स्पर्धेत पाच सलग षटकार मारण्याचा दुबेचा विक्रम 
- दुबेने पहिल्या 12 धावांसाठी 14 चेंडू घेतले; पण त्यानंतरच्या 42 धावा 15 चेंडूंत 
- शिवमचे या मोसमात यापूर्वी 60 चेंडूंत 6 चौकारांसह 79 आणि 67 चेंडूंत 10 षटकारांसह 118 
- ट्‌वेंटी 20 मध्ये अर्धशतक करणारा शिवम दुबे 17 वा भारतीय फलंदाज

संक्षिप्त धावफलक :- 
भारत : 7 बाद 170 (रोहित शर्मा 15 - 18 चेंडूंत 2 चौकार, केएल राहुल 11 - 11 चेंडूंत 1 चौकार, शिवम दुबे 54 - 30 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकार, विराट कोहली 19 - 17 चेंडूंत 2 चौकार, रिषभ पंत नाबाद 33 - 22 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकार, श्रेयस अय्यर 10 - 11 चेंडूंत 1 चौकार, रवींद्र जडेजा 9 - 11 चेंडू, वॉशिंग्टन सुंदर 0, दीपक चहर नाबाद 1, अवांतर 18 - 13 वाईड आणि 2 नो बॉलसह, केस्रीक विल्यम्स 4-0-30-2, किएरॉन पोलार्ड 2-0-29-0, हेडन वॉल्श 4-0-28-2) पराजित वि. वेस्ट इंडिज : 18.3 षटकात 2 बाद 173 (लेडंल सिमन्स नाबाद 67 - 45 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार, एविन लुईस 40 - 35 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार, शिमरॉन हेतमेयर 23 - 14 चेंडूत 3 षटकार, निकोलस पूरण नाबाद 38 - 18 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार, दीपक चहर 3.3-0-35-0, भुवनेश्वर कुमार 4-0-36-0, युजवेंदर चहल 3-0-36-0)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com