#KXIPvsRCB - सामना गमावल्यानंतर विराटला आणखी एक दणका; झाला 12 लाख रुपयांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

आयपीएलच्या सध्याच्या हंगामात पहिल्यांदाच एखाद्या कर्णधारावर दंडात्मक कारवाई होत आहे. अशी चूक पुन्हा झाल्यास कर्णधारावर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

दुबई - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला दारूण पराभव स्वीकारावा लागला. पराभवासोबत आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला दंडही झाला आहे. निर्धारीत वेळेत षटके न टाकल्याने विराटला दंड करण्यात आला. यासाठी त्याला 12 लाख रुपयांची रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. विराटच्या संघाने निर्धारीत वेळेत 20 षटके पूर्ण केली नाहीत. त्यामुळे पंजाबचा डाव उशिरा संपला.

आयपीएलच्या नियमानुसार वेळेत षटके पूर्ण न झाल्यास कर्णधाराला दंड केला जातो. आयपीएलच्या सध्याच्या हंगामात पहिल्यांदाच एखाद्या कर्णधारावर दंडात्मक कारवाई होत आहे. अशी चूक पुन्हा झाल्यास कर्णधारावर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

पंजाबविरोधात विराट कोहलीने 6 गोलंदाजांचा वापर केला. प्रत्येक गोलंदाजाची पंजाबच्या फलंदाजांनी तुफान धुलाई केली. यावेळी विराट प्रत्येक चेंडुनंतर गोंलदाजाशी बोलताना दिसत होता. त्यामुळे षटक पूर्ण व्हायला वेळ लागला. तसंच डेल स्टेन, उमेश यादव यांची षटके पूर्ण होण्यास इतरांच्या तुलनेत जास्त वेळ लागत होता. याशिवाय केएल राहुलच्या खेळीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला चांगलंच दमवलं. केअल राहुलने 69 चेंडूत तुफान फटकेबाजी केली. त्याचे दोन झेलही विराट कोहलीने सोडले. यानंतर शतक साजरं करत केएल राहुलने जीवदानाचा फायदा घेतला. 

हे वाचा - IPL 2020 : 'राहुल, नाम तो सुना ही होगा'; यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक

इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा किंग्ज इलेव्हन पंजाबने पराभव केला. पंजाबने बेंगळुरुला 97 धावांनी पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 206 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना आरसीबीच्या संघाला 109 धावांपर्यंत मजल मारता आली. विराटसह संघातील सर्वच खेळाडू धावा करण्यात अपयशी ठरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ipl 2020 kxip vs rcb virat kohli fined for slow over rate