IPL 2021 : UAE ला जाण्यापूर्वी धोनीचा संघ चेपॉकमध्ये ठोकणार तंबू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSK

UAE ला जाण्यापूर्वी धोनीचा संघ चेपॉकमध्ये ठोकणार तंबू

महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघ आयपीएल (IPL) स्पर्धेतील उर्वरित सामन्यांच्या तयारीला लवकरच सुरुवात करणार आहे. पुढच्या महिन्यापासून चेपॉकच्या मैदानावर चेन्नई संघाच्या शिबिराला सुरुवात होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. यावेळी सर्व खेळाडू या ठिकाणी एकत्र जमतील, असेही बोलले जात आहे. (IPL 2021 Chennai Super Kings Likely To Have A Camp In Chepauk Next Month)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 2021 च्या हंगामातील आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली होती. आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून युएईच्या मैदानात रंगणार आहेत. या स्पर्धेतील तयारीसाठी चेन्नईचा संघ चेपॉकच्या मैदानात सराव करणार असल्याचे समजते.

युएईमधील खेळपट्टी सुरुवातीच्या टप्प्यात स्लो असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे चेपॉकच्या मैदानावरील प्रॅक्सिटस चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या फायद्याचे ठरु शकेल. चेन्नई सुपर किंग्जचा संघ सरावाच्या बाबतीत इतर फ्रेंचायझी संघाच्या तुलनेत आघाडीवर राहिल्याचे यापूर्वीही पाहायला मिळाले आहे. तिची रणनिती त्यांच्याकडून पुन्हा एकदा पाहयला मिळण्याचे संकेत पुन्हा एकदा दिसू लागले आहेत.

कोरोनामुळे ज्यावेळी स्पर्धा स्थगित करण्यात आली त्यावेळी गुणतालिकेत सीएसकेचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. त्यांनी 7 पैकी 5 सामन्यात विजय नोंदवला होता. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघ अव्वलस्थानी आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी कमालीची राहिली असून ते प्रबळ दावेदारांच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

मोठ्या भावासाठी ट्रॉफी जिंकायची

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने धोनीसाठी पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकायची असल्याचे बोलून दाखवले आहे. उर्वरित सामन्यात दमदार कामगिरी करुन धोनी भाईसाठी पुन्हा ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरु, असे रैनाने म्हटले आहे.