esakal | IPL 2021: SRH वाल्यांनी नेटकऱ्यांच ऐकलं; पांड्येजीच्या जागी केदार भाऊला संधी

बोलून बातमी शोधा

Kedar Jadhav
IPL 2021: SRH वाल्यांनी नेटकऱ्यांच ऐकलं; पांड्येजीच्या जागी केदार भाऊला संधी
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद चांगलाच संघर्ष करताना पाहायला मिळते. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील ऑरेंज आर्मीला पराभवाच्या हॅटट्रिकची नामुष्की ओढावली. पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या सनरायझर्स हैदराबादने पहिल्या तीन सामन्यातील पराभवानंतर आता संघात मोठा बदल केला आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात केन विलियमसन संघात परतला असून मनीष पांड्येच्या जागी केदार जाधवला संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा: IPL 2021: हिटमॅनचा सिक्सर पाहून नताशाही झाली शॉक; व्हिडिओ व्हायरल

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद सहज सामना जिंकेल असे वाटले होते. पण अखेरच्या षटकातील खराब कामगिरीने त्यांनी हातील सामना सोडला. त्यांना या सामन्यात 13 धावांनी पराभूत व्हावे लागले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार चार बदलासह मैदानात उतरला होता. त्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. मुंबई विरुद्धच्या सामन्यातील हैदराबादच्या पराभवानंतर केदार जाधव ट्रेंडिगमध्ये दिसला होता. 2 कोटी मोजून जर तुम्ही केदार जाधवला खेळवत नसाल तर काय उपयोग? असा प्रश्न नेटकऱ्यांनी सनरायझर्स हैदराबादच्या मॅनेजमेंटला विचारला होता. अखेर नेटकऱ्यांच्या मनातील भावना सत्यात उतरल्या आहेत. स्पर्धेतील तीन सामन्यातील पराभवानंतर केदार जाधवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. मनिष पांड्येच्या जाग्यावर मिळालेल्या संधीच तो सोन करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आयपीएलमध्ये केदार जाधव (Kedar Jadhav) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडूनही खेळला आहे. त्यानंतर तो महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचाही सदस्य देखील राहिला. मागील वर्षी युएईमध्ये रंगलेल्या आयपीएल सामन्यात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्जने त्याला रिलीज केले. आयपीएलच्या मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. आयपीएल 2020 च्या हंगामात केदार जाधवने 8 सामन्यात 20.66 च्या सरासरीने केवळ 62 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट 93.93 इतका कमी होता. 26 ही त्याची सर्वोच्च खेळी होती. केदार जाधव आतापर्यंत 87 आयपीएल सामने खेळले आहेत. यात 22.82 च्या सरासरीसह 124.15 च्या स्‍ट्राइक रेटने त्याने 1141 धावा केल्या आहेत. 25 वेळा नाबाद राहिलेल्या जाधवच्या खात्यात 99 चौकार आणि 38 षटकार जमा आहेत. हैदराबाद विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात दमदार खेळी करुन संघातील स्थान कायम करण्याची त्याला सुवर्ण संधी आहे.