esakal | IPL 2021: "फायनलमध्ये KKRने कर्णधारालाच संघातून बाहेर करावं"
sakal

बोलून बातमी शोधा

Trevor Bayliss appointed as a head coach of KKR

इंग्लंडच्या माजी कर्णधारानेच केलं वक्तव्य

IPL 2021: "फायनलमध्ये KKRने कर्णधारालाच संघातून बाहेर करावं"

sakal_logo
By
विराज भागवत

दिल्लीविरूद्धच्या सामन्यात कोलकाताने ३ गडी राखून विजय मिळवला आणि फायनलचं तिकीट मिळवलं. १३६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल या दोघांनीही दमदार कामगिरी केली. व्यंकटेश अय्यरने ५५ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकार समाविष्ट होते. गिलला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने ४६ चेंडूत ४६ धावा केल्या. या दोघांच्या विकेटनंतर सामना विचित्र प्रकारे फिरला. नितीश राणा १३ धावांवर बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, शाकीब अल हसन आणि सुनील नारायण हे चौघे भोपळाही फोडू शकले नाहीत. पण अखेर राहुल त्रिपाठीने मोक्याच्या क्षणी षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरलेल्या कर्णधार इयॉन मॉर्गनबद्दल इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने रोखठोक मत व्यक्त केलं.

"फायनलसाठी कोलकाताच्या संघाने पिचचा अंदाज घेऊन मगच संघात बदल करावेत. कारण शारजाच्या पिचवर ते ज्यावेळी खेळले आहेत, तेव्हा त्याचा अंदाज असल्याने त्यांनी संघात बदल केलेले नाहीत. पण दुबईच्या खेळपट्टीवर गणितं नक्कीच बदलतील. तेथील पिच वेगळं असेल यात शंका नाही. अशा वेळी जर आंद्रे रसल चार षटकं टाकू शकणार असेल, तर त्याला शाकिबच्या जागी संघात घेता येईल. रसल हा एक धडाकेबाज खेळाडू आहे. तो त्याच्या खेळीच्या जोरावर २५ धावा कशाही काढू शकतो. अशा परिस्थितीत मॉर्गनने स्वत:लाच संघातून बाहेर काढलं पाहिजे. त्याने तसं केलं तर त्याचं मला आश्चर्य वाटणार नाही", असं वॉन म्हणाला.

प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दिल्लीला चांगली सुरूवात मिळवून दिली. पण पृथ्वी शॉ १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर मार्कस स्टॉयनीसही २३ चेंडूत केवळ १ चौकार लगावत १८ धावांवर बाद झाला. स्टॉयनीस बाद झाल्यावर थोड्याच वेळात शिखर धवनदेखील ३९ चेंडूत ३६ धावा काढून बाद झाला. त्याने १ चौकार आणि २ षटकार लगावले. धवननंतर कोणताही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. ऋषभ पंत ६ धावांवर माघारी परतला. शिमरॉन हेटमायरला एक जीवनदान मिळालं पण तो १७ धावा काढून धावबाद झाला. श्रेयस अय्यर शेवटपर्यंत खेळपट्टीवर तग धरत २७ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या आणि संघाला १३५ धावांपर्यंत मजल मारून दिली.

loading image
go to top