
इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत शुक्रवारी (२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्सला सनरायझर्स हैदराबादने ५ विकेट्सने पराभूत केले. चेपॉक स्टेडियमवर हैदराबादने पहिल्यांदाच विजय मिळवला. दोन्ही संघांसाठी हा स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. कारण दोन्ही संघ पाँइंट्स टेबलमध्ये तळात होते.
तथापि, हैदराबादने शुक्रवारी विजय मिळवत हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी ९ सामन्यांपैकी ६ पराभव स्वीकारले आहेत आणि ३ विजय मिळवले आहे. चेन्नईला मात्र ९ सामन्यांमधील ७ व्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी अद्याप दोनच विजय मिळवले आहेत.
त्यामुळे अद्याप जरी दोन्ही संघांसाठी प्लेऑफचे दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नसले, तरी पुढचा मार्ग कठीण आहे. त्यातही चेन्नईसाठी तो हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर आणखी कठीण झाला आहे. आता या दोन्ही संघांसाठी पुढील समीकरण कसे असेल, याचा थोडक्यात आढावा घेऊ.