
WTC Final 2023 : हार्दिक पांड्याची एक चूक कर्णधार रोहित अन् टीम इंडियाला WTC मध्ये पडणार महागात!
Ind vs Aus WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या फायनलला फक्त एक आठवडा बाकी आहे. 7 जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ विजेतेपदासाठी आमनेसामने असणार आहेत. जवळपास 20 वर्षांनंतर अशी संधी आली आहे, जेव्हा आयसीसी ट्रॉफीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे.
आयपीएल 2023 संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू शेवटच्या बॅचप्रमाणे लवकरच इंग्लंडला जाणार आहेत. दुसरीकडे जे खेळाडू आधी गेले आहे , त्यांची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान आयपीएल मध्ये हार्दिक पांड्याने केलेली चूक टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये महागात पडू शकते.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनल गाठली, परंतु एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने जीटीचा पाच गडी राखून पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला.
दरम्यान, गुजरात टायटन्स आणि त्याचा कर्णधार हार्दिक पंड्याने ऋद्धिमान साहाला संपूर्ण आयपीएलमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी दिली. पण विशेष बाब म्हणजे केएस भरतही या वर्षी गुजरात टायटन्सच्या संघात होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
आता तो बाकीच्या खेळाडूंसोबत इंग्लंडला जाणार आहे, जिथे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे. पण जवळपास दोन महिने एकही सामना न खेळलेला केएस भरत अचानक मैदानात उतरल्यावर कशी कामगिरी करेल हे पाहणे रंजक ठरेल.
केएस भरतने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने खेळले असले तरी, जिथे त्याच्या बॅटने काही खास कामगिरी केली नाही, परंतु त्याने यष्टिरक्षणाने सर्वांची मने जिंकण्याचे काम केले.
इशान किशनचीही यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात निवड झाली आहे. तो पहिल्या संघात नव्हता, पण नंतर केएल राहुल दुखापतीमुळे आयपीएल आणि नंतर डब्ल्यूटीसी फायनलमधून बाहेर पडला तेव्हा इशान किशनला मुख्य संघात समाविष्ट करण्यात आले.
आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघासाठी सर्व सामने खेळतानाही दिसला होता, पण संघ व्यवस्थापन सातत्याने खेळत असलेल्या इशान किशनला की दोन महिने बाहेर असलेल्या के.एस भरतला संधी देणार.
विशेष म्हणजे इशान किशनची याआधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसाठीही निवड झाली होती, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने अद्याप टीम इंडियासाठी पदार्पणही केलेले नाही, त्यामुळे अंतिम फेरीत थेट पदार्पण करणे कोणत्याही अर्थाने सोपे होणार नाही.
WTC फायनलसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, इशान किशन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट.