IPL 2021 Final: चेन्नईच 'सुपर किंग'; CSKचा विजेतेपदाचा चौकार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSK-win-IPL-2021

फाफ डू प्लेसिसच्या धडाकेबाज ८६ धावा, शार्दूल ठाकूरचे ३ बळी

IPL 2021: चेन्नईच 'सुपर किंग'; CSKचा विजेतेपदाचा चौकार!

IPL 2021 FINAL मध्ये चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघावर २७ धावांनी विजय मिळवला आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. फाफ डू प्लेसिसच्या दमदार ८६ धावांच्या खेळीच्या जोरावर CSK ने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९२ धावांचा डोंगर उभारला होता. हे आव्हान KKR च्या फलंदाजांना पेलता आले नाही. सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५०) आणि शुबमन गिल (५१) यांनी संघाला दमदार सलामी मिळवून दिल्यानंतर इतर फलंदाजांनी मात्र त्यांच्या प्रयत्नांची माती केली. कोणताही फलंदाज जबाबदारीने न खेळल्यामुळे त्यांना २७ धावांनी पराभूत होऊन उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

पाहूया CSK vs KKR सामन्यातील काही महत्त्वाचे क्षण-

IPL 2021: चेन्नईच 'सुपर किंग'; CSKचा विजेतेपदाचा चौकार!

१० षटकांपर्यंत कोलकाताच्या बाजूने झुकलेला डाव त्यानंतर अचानक CSK कडे झुकला. बिनबाद ९० या धावसंख्येवर KKR ने २० षटकात ९ बाद १६५ पर्यंत मजल मारली. त्यामुळे CSK ने २७ धावांनी विजयी होत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

------------------------------------------------------------------------

KKR च्या डावाली 'महागळती'; CSK विजयासमीप

कोलकाताची धावसंख्या बिनबाद ९० होती. त्यानंतर त्यांच्या डावाला महागळती लागली आणि चेन्नईच्या गोलंदाजांनी सामना पूर्णपणे फिरवला.

------------------------------------------------------------------------

जाडेजाचे एका षटकात २ बळी; कार्तिक, शाकीब बाद

KKR चा संघ सामन्यात पुढे असताना रविंद्र जाडेजाने एका षटकात २ बळी टिपले. चांगल्या लयीत दिसणारा दिनेश कार्तिक ९ धावांवर बाद झाला. पाठोपाठ शाकीब अल हसन शून्यावर माघारी परतला.

------------------------------------------------------------------------

 • गिल शानदार अर्धशतकानंतर बाद; सामन्यात रंगत

सलामीवीर शुबमन गिलने आपला फॉर्म कायम राखत दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ४३ चेंडूत ६ चौकारांसह ५१ धावा केल्या. पण मोठा फटका खेळताना तो बाद झाला.

------------------------------------------------------------------------

 • शार्दूलला एकाच षटकात २ बळी; अय्यर, राणा तंबूत

IPL च्या युएई टप्प्यात दमदार कामगिरी करणारा व्यंकटेश अय्यर धडाकेबाज अर्धशतक ठोकून माघारी परतला. डावाच्या दुसऱ्याच षटकात त्याला जीवनदान मिळाले. त्यानंतर त्याने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. त्याला शार्दूल ठाकूरने माधारी धाडले. त्याच षटकात शेवटच्या चेंडूवर नितीश राणालाही पहिल्याच चेंडूवर झेलबाद होण्यास भाग पाडले.

------------------------------------------------------------------------

 • KKRचं दमदार प्रत्युत्तर; 'पॉवर प्ले'मध्ये धमाका

१९३ धावांच्या बड्या आव्हानाचा पाठलाग करताना KKR च्या सलामीवीरांनी दमदार प्रत्युत्तर दिलं. 'पॉवर प्ले'च्या ६ षटकांमध्ये व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल या दोघांनी संघाला बिनबाद ५१ धावांची मजल गाठून दिली.

धोनीने दुसऱ्या षटकात व्यंकटेश अय्यरला जीवदान दिलं. त्या व्हिडीओसाठी क्लिक करा.

------------------------------------------------------------------------

 • डू प्लेसिसचा धमाका; KKRला १९३ धावांचे आव्हान

फायनल्स खेळण्याचा तगडा अनुभव असलेल्या CSK ने यंदाच्या फायनलमध्येही दमदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने KKR ला १९३ धावांचे आव्हान दिले. फाफ डू प्लेसिसची ५९ चेंडूत ८६ धावांची खेळी आणि त्याला ऋतुराज (३२), रॉबिन उथप्पा (३१) आणि मोईन अली (३७*) यांनी दिलेली साथ याच्या जोरावर CSK ने ३ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली.

------------------------------------------------------------------------

 • मोईन-डू प्लेसिसची तुफान फटकेबाजी; KKR चिंतेत

मोईन अली आणि फाफ डू प्लेसिस या दोघांनी तुफान फटकेबाजी करत CSK ला १७ षटकात दीडशतकी (१५३-२) मजल मारून दिली.

------------------------------------------------------------------------

 • उथप्पाच्या दमदार खेळीला नारायणने लावला ब्रेक

रॉबिन उथप्पाने दमदार सुरूवात करत १५ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. पण सुनील नारायणने त्याच्या खेळीला ब्रेक लावला.

------------------------------------------------------------------------

 • डू प्लेसिसचं दमदार अर्धशतक; CSKची शतकी मजल

फाफ डू प्लेसिस २ धावांवर असताना दिनेश कार्तिकने त्याच्या स्टंपिंगची संधी सोडली. त्या जीवनदानाचा वापर करत डू प्लेसिसने ३५ चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. हे त्याचे IPLमधील २२वे अर्धशतक ठरले. तसेच, त्याने १२व्या षटकात संघालाही शतकी मजल मारून दिली.

------------------------------------------------------------------------

 • CSKला पहिला धक्का; ऋतुराज झाला झेलबाद

अप्रतिम सुरूवात मिळालेल्या CSK ला आठव्या षटकात पहिला धक्का बसला. अडीच मिनिटांच्या 'स्ट्रॅटेजिक टाईम आऊट'नंतर लगेचच ऋतुराज गायकवाड सुनील नारायणचा बळी ठरला. ऋतुराजने २७ चेंडूत ३ चौकार आणि एक षटकार लगावत ३२ धावा केल्या.

------------------------------------------------------------------------

 • CSK ने पॉवर प्ले गाजवला; दिली दमदार सलामी

चेन्नईच्या संघाने फायनलसारख्या प्रतिष्ठेच्या सामन्यात पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला. प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस या ओपनर जोडीने संघाला पॉवर प्ले च्या ६ षटकात बिनबाद ५० धावांची दमदार सलामी मिळवून दिली.

------------------------------------------------------------------------

 • धोनीचा कर्णधार म्हणून 300वा T20 सामना

महेंद्रसिंग धोनी आज कर्णधार म्हणून आपला ३००वा सामना खेळत आहे. टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्ज आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स या तीन संघासाठी त्याने कर्णधार म्हणून मैदान गाजवले आहे.

याशिवाय, रविंद्र जाडेजा, फाफ डू प्लेसिस आणि अंबाती रायुडू या तिघांसाठीही आजचा सामना खास आहे. रविंद्र जाडेजा आज २००वा तर अंबाती रायुडू १७५वा IPL सामना खेळत आहे. त्यासोबतच फाफ डू प्लेसिस CSKकडून आपला १००वा सामना खेळत आहे.

------------------------------------------------------------------------

 • KKRने टॉस जिंकला; CSKची प्रथम फलंदाजी

कोलकाता संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. CSKचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या संघात कोणतेही बदल केलेले नाहीत.

------------------------------------------------------------------------

loading image
go to top