esakal | IPL 2021, CSK vs DC : अंपायरकडून पंतला बर्थडे गिफ्ट; धोनी बघतच राहिला!
sakal

बोलून बातमी शोधा

CSK vs DC

CSK vs DC : अंपायरकडून पंतला बर्थडे गिफ्ट; धोनी बघतच राहिला!

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, CSK vs DC : चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने 51 धावांत दोन विकेट गमावल्या. पृथ्वी शॉ 12 चेंडूत 18 धावा करुन माघारी फिरल्यानंतर मैदानात उतरलेला श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी फिरला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पंत विरोधात पहिल्याच चेंडूवर हेजलवूडनं कॅच आउटचं अपील केलं. सहाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर धोनीनं पंतच्या विकेटसाठी रिव्ह्यूही घेतला. पण पंतची बॅट आणि हेजलवूडने टाकलेल्या बॉलचा कोणताही संपर्क नसल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने रिव्ह्यू गमावला.

त्यानंतर बर्थडे बॉय रिषभ पंतला मैदानातील पंचांनीही एक बर्थडे गिफ्ट दिल्याचे पाहायला मिळाले. सातव्या षटकातील रविंद्र जाडेजाच्या तिसऱ्या चेंडूवर पंत यष्टीसमोर सापडला. जड्डूनं यावेळी जोरदार अपीलही केली. पण मैदानातील पंचांनी पंतला नाबाद दिले. चेन्नईने यापूर्वीच्या षटकातच रिव्ह्यू गमावला असल्यामुळे यष्टीमागे धोनीला या विकेटबाबत खात्री असूनही फक्त बघत बसण्याची वेळ आली. रिप्लायमध्ये पंत विरोधातील हा निर्णय अगदी क्लोज असल्याचे दिसून आले. एका अर्थाने पंतला मैदानातील पंचांनी पंतला बर्थडे गिफ्टच दिले.

बर्थडे दिवशी पंतला धमाकेदार खेळी करण्यात अपयश आले. 12 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार खेचून अवघ्या 15 धावांवरच तो चालता झाला. जाडेजानेच त्याची विकेट घेतली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातील आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात जाडेजाने 100 kph वेगाने चेंडू फेकल्याचे पाहायला मिळाले. पंतला त्याने ज्या चेंडूवर बाद केले तो चेंडू 107.1kph वेगाने फेकला होता. त्यामुळेच पंत फसला आणि मोईन अलीच्या हाती झेल देऊन तंबूत परतला.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने वाढदिवसाच्या दिवशी टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत चेन्नईच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर अंबाती रायडूनं केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 20 षटकात 5 बाद 136 धावांपर्यंत मजल मारली.

loading image
go to top