esakal | IPL 2021 : ते आमच्या सुख-दुःखाचे साथी; मॅचनंतर हिटमॅनची चाहत्यांसाठी 'बोलंदाजी' |MI vs SRH
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

ते आमच्या सुख-दुःखाचे साथी; मॅचनंतर हिटमॅनची चाहत्यांसाठी 'बोलंदाजी'

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, MI vs SRH : आम्ही हरलो किंवा जिंकलो तरी ते आमच्या सोबत असतात, अशा शब्दांत मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) चाहत्यांचे आभार मानले आहेत. आयपीएलच्या 14 व्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स विरुद्ध विजय मिळवूनही मुंबई इंडियन्सला प्ले ऑफ गाठता आली नाही. मुंबई इंडियन्सला प्ले ऑफच्या क्वालिफिकेशनसाठी हा सामना 171 धावांनी जिंकायचा होता. पहिल्यांदा बॅटिंग करताना मुंबई इंडिन्सने धावफलकावर 235 धावा लावत चाहत्यांना पुन्हा एकदा शेवटपर्यंत लढण्याची क्षमता दाखवली. पण सनरायझर्स हैदराबादला ते 65 धावांत रोखू शकले नाहीत. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना 42 धावांनी जिंकूनही त्यांना पाचव्या स्थानावर रहावे लागले आणि त्यांचे प्ले ऑफचे दरवाजे बंद झाले.

हेही वाचा: MI vs SRH : मॅच आली, पण प्ले ऑफची संधी गेली

सामन्यानंतर रोहित शर्माने संघ म्हणून कमी पडलो, अशी प्रामाणिक कबूली दिली. दुसऱ्या टप्प्यात युएईमध्ये लागोपाठ पराभवाचा सामना करणे महागात पडल्याचेही तो म्हणाला. यंदाच्या हंगामात आलेले अपयश हे फलंदाजी किंवा गोलंदाजीतील उणीव नसून आम्ही टीम म्हणून कमी पडलो. मागील चार-पाच वर्षांपासून टीम म्हणून आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या चाहत्यांना आमच्यावर विश्वास आहे. आम्ही स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे त्यांची निराशा झालीये. पण ते आमच्यासोबतच असतील. आम्ही चांगले खेळतो त्यावेळी ज्याप्रमाणे ते आमच्यासोबत असतात अगदी त्याप्रमाणेच आमच्या वाईट काळातही ते आमच्या पाठिशी असतात, अशा भावना रोहित शर्माने मुंबईला प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांप्रती व्यक्त केल्या.

हेही वाचा: IPL 2021: शेवटच्या चेंडूवर षटकार; RCB चा दिल्लीवर थरारक विजय

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. मागील सलग दोन वर्षे त्यांनी जेतेपद पटकावले होते. यंदाच्या हंगामात त्यांना जेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी होती. पण साखळी फेरीतच त्यांना गाशा गुंडाळावा लागला. मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात 14 पैकी 7 सामने जिंकत 14 गुण मिळवले. कोलकाताच्या खात्यातही त्यांच्या इतकेच गुण आहेत. पण नेट रन रेटच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला मागे टाकत प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले.

loading image
go to top