esakal | IPL Record : जम्मूच्या पोरानं रचला वेगवान चेंडू टाकण्याचा नवा विक्रम | Umran Malik
sakal

बोलून बातमी शोधा

IPL Record : जम्मूच्या पोरानं रचला वेगवान चेंडू टाकण्याचा नवा विक्रम

IPL Record : जम्मूच्या पोरानं रचला वेगवान चेंडू टाकण्याचा नवा विक्रम

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलच्या 14 व्या हंगामात सुरुवातीपासून सूर्यास्ताच्या दिशेनं झुकलेल्या आणि स्पर्धेतून बाद झालेल्या सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून जम्मू काश्मीरचा आणखी एक हिरा चमकला. टी-नटराजन कोविड पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट म्हणून उजव्या हाताच्या जलदगती गोलंदाजाला हैदराबादने आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. हैदराबादच्या संघाकडून नेट बॉलर म्हणून युएईला गेलेल्या उमरान मलिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थानही मिळाले. श्रीमंत लीगमध्ये खेळणारा तो जम्मू काश्मीरचा चौथा खेळाडू आहे.

यापूर्वी परवेझ रसूल, रसिख सलम आणि अब्दुल समद हे जम्मू काश्मीरचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसले आहेत. अष्टपैलू समद अजूनही सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून खेळतो. या खेळाडूंशिवाय मोहम्मद मुधशीर आणि मंझूर पांडव या खेळाडूंवरही आयपीएलमध्ये बोली लागली. पण त्यांना एकही सामना खेळायला मिळाला नव्हता.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या पदार्पणातील सामन्यात आपल्या गतीने उमरान मलिकनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. यंदाच्या हंगामात सर्वात वेगाने चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाज होण्याचा पराक्रम करुन दाखवला. त्याने 151.03 kph वेगाने चेंडू टाकला होता. दुसऱ्या सामन्यात यात त्याने आणखी भर टाकली. शिवाय आयपीएलमधील पहिली- वहिली विकेटही घेतली.

21 वर्षीय गोलंदाजाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी श्रीकर भरतला बाद केलं. बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये आणखी एक खास विक्रम आपल्या नावे केला. आपल्या दुसऱ्या सामन्यात सातत्याने तो 150 kph वेगाने चेंडू टाकताना पाहायला मिळाले. यातील एक चेंडू त्याने तब्बल 153 kph वेगाने फेकला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय गोलंदाजाने टाकेलाल हा सर्वात वेगवान चेंडू आहे. यापूर्वी नवदीप सैनीने 152.85 kph वेगाने चेंडू फेकला होता.

उमरानने मागील वर्षीच जम्मू काश्मीरच्या वरिष्ठ संघातून लिस्ट ए आणि टी-20 सामन्यात पदार्पण केले होते. जानेवारी 2021 मध्ये त्याने रेल्वे विरुद्ध एकमेव टी-20 सामना खेळला होता. या सामन्यात त्याने 3 विकेट घेतल्या होत्या. वेगासोबत चेंडूवर नियंत्रण राखण्यात तो यशस्वी ठरला तर भविष्यात तो टीम इंडियाच्या जर्सीत दिसला तर नवलं वाटणार नाही. बीसीसीआय या उगवत्या जलदगती गोलंदाजासाठी काही सुविधा उपलब्ध करुन देणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.

loading image
go to top