
IPL 2022: मुंबईचा 'सूर्य' तळपला मात्र कमिन्सने विजयी मनसुब्यांचा 'कचरा' केला
पुणे : कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) पॅट कमिन्सने (Pat Cummins) बॉलिंग मधील बदला बॅटिंगमध्ये घेतला. त्याने 14 चेंडूत ठोकलेल्या अर्धशतकामुळे केकेआरने मुंबईचा (Mumbai Indians) 5 विकेट्सनी पराभव केला. मुंबईचे 162 धावांचे आव्हान केकेआरने 16 षटकात 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. केकेआरकडून कमिन्सने 56 तर व्यंकटेश अय्यरने 41 चेंडूत 50 धावा केल्या.
हेही वाचा: KKR vs MI : मुंबईचा उषःकाल होता होता काळ रात्र झाली; पाहा Highlights
मुंबईचे 162 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरची सुरूवात खराब झाली. पॉवर प्लेमध्येच अजिंक्य रहाणे (7) आणि श्रेयस अय्यर (10) हे अनुभवी फलंदाज माघारी फिरले होते. मात्र त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि सॅम बिलिंग्ज यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी केकेआरला 10 षटकात 67 धावांपर्यंत पोहचवले. परंतु मुर्गन अश्विनने बिलिंग्जला 17 धावांवर तर नितीश राणाला 8 धावांवर बाद करत केकेआरची अवस्था 4 बाद 83 अशी केली.
त्यानंतर आक्रमक फलंदाज आंद्रे रसेलने काही आक्रमक फटके मारून केकेआरचे शतक पार करून दिले. मात्र डावखुरा वेगवान गोलंदाज टायमर मिल्सने रसेलला बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला. दरम्यान, पाकिस्तानचा दौरा करून आलेल्या पॅट कमिन्सने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने व्यंकटेश अय्यर अँकर इनिंग खेळत होता. कमिन्सने 14 चेंडूत अर्धशतक झळकावत मुंबईपासून विजय दूर नेला त्याने डॅनियल सॅम्सच्या एकाच षटकात 35 धावा चोपल्या. कमिन्सने 16 व्या षटकात सामना जिंकून दिला. त्याने 15 चेंडूत 56 तर व्यंकटेश अय्यरने 41 चेंडूत 50 धावा केल्या.
हेही वाचा: कॅडबरीचं गोड गिफ्ट! ग्राऊंड्समनसाठी केले 5 स्टार हॉटेल बुक
आयपीएलच्या 14 व्या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र मुंबईची सुरूवात खराब झाली. भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या उमेश यादवने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला 3 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर युवा डेवाल्ड ब्रेविस आणि इशान किशनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र इशान किशनने संथ फलंदाजी केल्याने मुंबईच्या धावगतीला ब्रेक लागला. अखेर मुंबई आठव्या षटकात 45 धावांवर पोहचली असताना 29 धावा करणारा ब्रेविसला चक्रवर्तीने बाद केले. पाठोपाठ पॅट कमिन्सने 21 चेंडूत 14 धावा करणाऱ्या इशान किशनला बाद करत तिसरा धक्का दिला.
मात्र यानंतर कमबॅक करणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईला सावरले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी रचली. त्यांनी 10 ते 15 षटकापर्यंत संयमी खेळी केली. त्यानंतर तडाखेबाज फलंदाजी करत धावगती 15 च्या सरासरीने वाढवली. सूर्यकुमार यादवने (52 धावा) अर्धशतकी खेळी केली. मात्र अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तो पॅट कमिन्सची शिकार झाला. त्यानंतर कायरॉन पोलार्डने अखेरच्या षटकात 3 षटकार मारत मुंबईला 161 धावांपर्यंत पोहचवले. युवा तिलक वर्मा हा 27 चेंडूत 38 धावा करून नाबाद राहिला.
Web Title: Ipl 2022 Pat Cummins Blasting Batting Kolkata Knight Riders Defeat Mumbai Indians
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..