
अस्तित्व पणास लागत असलेल्या मुंबई इंडियन्ससमोर या आयपीएलमध्ये आज (१३ एप्रिल) चारपैकी चारही सामने जिंकणाऱ्या दिल्ली कॅपीटल्सचे आव्हान आहे. तसेच पाय खोलात जात असलेल्या रोहित शर्माला या सामन्यात दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे.
आयपीएलमध्ये पाच अजिंक्यपद आणि यंदा पाचपैकी चार सामन्यांत पराभव अशी स्थिती मुंबई इंडियन्सची झाली आहे. तर अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्लीचा संघ अपराजित आहे, त्यामुळे आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेता मुंबईसाठी दिल्ली बहुत दूर हैं अशीच आहे.
क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराच्या पुनरागमनामुळे मुंबईचा संघ समतोल झालेला असला तरी मूळ चिंता फलंदाजीतील अपयशाची आहे. एकीकडे दिल्लीचा संघ सलग पाचवा विजय मिळवून सातत्य राखण्याचा प्रयत्न करेल, तर मुंबईला आव्हान कायम ठेवायचे असेल तर पराभवाची मालिका खंडित करावी लागण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही; परंतु कामगिरीत फिनिक्स भरारी घ्यावी लागणार आहे.