
बुधवारी (७ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला २ विकेट्सने पराभूत केले. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने कोलकाताला पराभूत करत अखेर तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे.
चेन्नईचे स्पर्धेतील हंगाम यापूर्वीच संपले आहे. पण या सामन्यातील विजयामुळे त्यांना २ गुण मिळाले असून आता ते १२ सामन्यांनंतर ६ गुणांवर पोहचले आहेत. पण तरी ते १० व्या स्थानीच कायम आहेत. मात्र आता कोलकातासमोरील आव्हान कठीण झाले आहे.
या सामन्यात कोलकाताने १८० धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने १९.४ षटकात ८ विकेट्स गमावत १८३ धावा करत पूर्ण केला. चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने अर्धशतक केले, तर पदार्पणवीर उर्विल पटेल आणि शिवम दुबेनेही महत्त्वपूर्ण खेळी केली.