बंगळूर, ता. २३ : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत आठ सामन्यांमधून पाच सामन्यांमध्ये विजय संपादन केले आहेत. तीन लढतींमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या तीनही लढती बंगळूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडल्या. घरच्या मैदानावर बंगळूर संघाला अद्याप एकाही विजयाला गवसणी घालता आलेली नाही. घरच्या मैदानावरील पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान बंगळूर संघासमोर असणार आहे. बंगळूर संघाला उद्या गुरुवारी (ता. २४) होत असलेल्या आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सशी दोन हात करावयाचे आहेत. राजस्थानसाठी उर्वरित सहाही लढतींमध्ये विजय आवश्यक आहे.