IPL 2022 : नवी मुंबईत बंगळूर विरुद्ध कोलकाता; कोण मारणार बाजी | RCB vs KKR | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RCB vs KKR

IPL 2022 : नवी मुंबईत बंगळूर विरुद्ध कोलकाता; कोण मारणार बाजी

नवी मुंबई : गतविजेत्यांना पराभवाचा धक्का देऊन यंदाच्या मोसमाची शानदार सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा बंगळूर संघाशी सामना होत आहे. बंगळूरने त्यांच्या पहिल्या सामन्यात काहीही चुकीचे केले नाही, तरी त्यांना पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कडवी चुरस अपेक्षित आहे.

विराट कोहली कर्णधार नसलेल्या बंगळूरचा पहिल्या सामन्यात पराभव झाला असला, तरी त्यांनी २०४ ही भक्कम धावसंख्या उभारली होती. गतस्पर्धेत सर्वाधिक विकेट मिळवणारा हर्षल पटेल संघात असतानाही त्यांना या धावसंख्येचे संरक्षण करता आले नव्हते. गोलंदाजीतील छोटे-मोठे कमकुवत दोष दूर केले तर बंगळूरसाठी विजय दूर नसेल.

विराट कोहलीने सोडलेले नेतृत्व, एबी डिव्हिल्यर्सची निवृत्ती आणि ग्लेन मॅक्सवेलसारख्या खेळाडूची अनुपस्थिती, युझवेंद्र चहलसारखा अनुभवी फिरकी गोलंदाज संघात नसणे यामुळे बंगळूरचा संघ नव्याने तयार होत आहे. टीम म्हणून लय मिळवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार फाफ डुप्लेसीने जोरदार फलंदाजी करत ८८ धावांची खेळी केली. विराटनेही ४१ धवांचा तडाखा दिला होता. उद्या कोलकाता विरुद्धही मोठी धावसंख्या उभारायची असल्यास या दोघा अनुभवी फलंदाजांना सातत्य ठेवावे लागणार आहे.

वाईड चेंडूंनी केला होता घात

२०५ धावांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या बंगळूरच्या गोलंदाजांनी तब्बल २१ वाईड चेंडूंच्या धावा दिल्या होत्या. यातील सर्वाधिक १४ धावा महम्मद सिराजने दिल्या होत्या. एरवी अचुक गोलंदाजी करणाऱ्या हर्षल पटेलचेही टप्यावर नियंत्रण नव्हते. बंगळूरच्या सर्वच गोलंदाजांना अचुकतेवर भर द्यावा लागणार आहे. कोलकाता संघही नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळत असला आणि त्यांच्या संघातही काही बदल झालेले असले तरी सुनील नारायण, आंद्र रसेल, वरुण चक्रवर्ती, नितीश राणा हे खेळाडू कायम आहेत. उमेश यादवने यंदाच्या स्पर्धेचाच पहिला चेंडू नोबॉल टाकून सुरुवात केली असली, तरी २० धावांत २ बळी अशी कामगिरी करून तो सामन्यात सर्वोत्तम ठरला होता. एकूणच कोलकाता संघाला पहिल्याच सामन्यातून लय मिळाली आहे, त्यामुळे उद्याच्या सामन्यात त्यांचे पारडे किंचित जड असेल.

आमने सामने

फाफ डुप्लेसी-विराट कोहली विरुद्ध उमेश यादव आणि सुनील नारायण यांच्यातले द्वंद सामन्यातील आकर्षण ठरणार आहे; तर श्रेयस अय्यर आणि आंद्र रसेल यांच्यासमोर हर्षल पटेल आणि हसरंगा यांचे आव्हान असेल.

नवी मुंबईत धावांचा पाऊस?

डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच सामन्यात ३९ षटकांत तब्बल ४१३ धावांचा पाऊस पडला होता. २०५ धावांचे लक्ष्य पार झाले होते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कोणतीही धावसंख्या पार केली जाऊ शकते.

Web Title: Rcb Vs Kkr Match Who Will Win Today Ipl 2022 Match 6

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLRCBKKRIPL 2022