
रोहित शर्माच्या बड्डेच्या दिवशी तरी मुंबईची साडेसाती संपणार का ?
IPL 2022: ३० एप्रिल हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा वाढदिवस! या दिवशी तरी त्याचा मुंबई इंडियन्स हा संघ पराभवाची मरगळ झटकून विजयाची सुरुवात करणार का, या प्रश्नीच्या उत्तराची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. सलग आठ पराभवांचा सामना केल्यानंतर मुंबईचा सामना आज फॉर्मात असलेल्या राजस्थानविरुद्ध होत आहे.
सलामीच्या जोडीचे अपयश ही मुंबईसाठी डोकेदुखी ठरत आहे. कर्णधार रोहित शर्मा (१५३ धावा) व इशान किशन (१९९ धावा) यांना अद्याप सूर गवसलेला नाही. तसेच सूर्यकुमार यादव, डीवाल्ड ब्रेव्हिस, तिलक वर्मा यांनी एकाच वेळी चांगली कामगिरी केलेली नाही. कधी हा तर कधी तो वैयक्तिकरीत्या चमकदार कामगिरी करीत आहेत. कायरॉन पोलार्ड हा फिनीशर म्हणून कमी पडत आहे. या मोसमात तो सपशेल अपयशी ठरला आहे. मुंबईला गोलंदाजी विभागातही निराशेला सामोरे जावे लागले आहे. अनुभवी जसप्रीत बुमराह वगळता एकालाही भेदक व प्रभावी गोलंदाजी करता आलेली नाही.
मजबूत फलंदाजी
राजस्थानच्या संघाची फलंदाजी मजबूत आहे. जोस बटलर याने ३ शतके व २ अर्धशतकांसह ४९९ धावांची फटकेबाजी केली आहे. कर्णधार संजू सॅमसन याने २२८ धावा, शिमरोन हेथमायर याने २२७ धावा, देवदत्त पडीक्कल याने १९९ धावा फटकावल्या आहेत. या चौघांसह रियान पराग यानेही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या लढतीत महत्त्वाच्या क्षणी नाबाद ५६ धावांची खेळी केली व संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे फलंदाजीत राजस्थानचा संघ सरस आहे,
युजवेंद्र चहल किल्ला लढवतोय
गेल्या मोसमापर्यंत बंगळूर संघाकडून खेळणारा लेगस्पिनर युझवेंद्र चहल यंदा राजस्थानमधून खेळत आहे; पण हा संघ त्याला चांगलाच मानवला आहे. त्याने ८ लढतींमधून १८ फलंदाज बाद केले आहेत. राजस्थानचा गोलंदाजी विभाग तो एकाहाती सांभाळतोय. अर्थात त्याला इतर गोलंदाजांचीही साथ लाभते आहे. प्रसिद्ध कृष्णाने १० बळी, रवीचंद्रन अश्विनने ७ बळी, ट्रेंट बोल्टने ७ बळी व कुलदीप सेनने ६ बळी टिपत संघासाठी मोलीची कामगिरी केली आहे. राजस्थानच्या संघाचा फॉर्म बघता उद्याचा पेपर मुंबईसाठी कठीण असेल, अशी चिन्ह निर्माण झाली आहेत.
Web Title: Rohit Sharma Birthday Mumbai Indians Team Today Match Win Mi Vs Rr Ipl 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..