केएल राहुलच्या फलंदाजीत 'बनावट'पणा नाही : गावसकर | Sunil Gavaskar Praise KL Rahul Batting | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Gavaskar Praise KL Rahul Batting

केएल राहुलच्या फलंदाजीत 'बनावट'पणा नाही : गावसकर

मुंबई : लखनौ सुपर जायंटचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) सध्या ड्रीम फॉर्ममध्ये आहे. त्याने यंदाच्या हंगामात दोन शतके ठोकली असून त्याच्या फलंदाजीवर भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) हे जाम खूष आहेत. त्यांच्या मते केएल राहुलने दाखवून दिले की टी 20 मध्ये वेगाने धावा करण्यासाठी वेडेवाकडे शॉट मारण्याची गरज नसते. केएल राहुलने यंदाच्या हंगामात दोन शतके ठोकली आहेत. त्याने ही दोन्ही शतके मुंबई इंडियन्स विरूद्ध ठोकली आहेत. तो सध्या 368 धावा करून हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत जॉस बटलर नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना सुनिल गावसकर म्हणाले की, 'केएल राहुल दमदार कामगिरी करत आहे. राहुलच्या फलंदाजीमध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे. त्याच्या फलंदाजीत कोणताही 'बनावट'पणा नाही. तो जे कोणतेही शॉट मारतो तो शॉट क्रिकेटचे नैसर्गिक शॉट आहेत. राहुलने आपल्या कौशल्याने सिद्ध करून दाखवले की वेगाने धावा करण्यासाठी तुम्हाला नवे शॉट तयार करण्याची गरज नाही. जर तुम्ही क्रिकेटच्या पुस्तकातील सर्व फटके खेळू शकत असाल तर तुम्ही धावा करू शकता. राहुलचे शॉट सिलेक्शन खूप जबरदस्त आहे.'

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने (Kevin Pietersen) देखील केएल राहुलच्या फलंदाजीची प्रशंसा केली आहे. पीटरन म्हणाला की, 'राहुलच्या भात्यात सर्व प्रकारचे फटके आहेत. तो मैदानावर चेंडू कोणत्याही दिशेला भिरकावून देऊ शकतो. त्याची फलंदाजी पाहणे ही एक पर्वणीच असते.' तर इरफान पठाण (Irfan Pathan) राहुलच्या फलंदाजीबाबत म्हणाला की, केएल राहुल हा एक असा फलंदाज आहे तो परिस्थितीनुसार धावांची गती वाढवू किंवा कमी करू शकतो. तो डाव आपल्या परीने पुढे नेण्याची क्षमता ठेवतो. राहुलला चांगल ठाऊक असतं की कोणत्या स्थितीत धावांची गती वाढवायची आहे.'