IPL 2024, DC vs CSK: ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नई का साधू शकते विजयाची हॅट्ट्रिक? ही आहेत कारणे

IPL 2024, DC vs CSK: रविवारी चेन्नई सुपर किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून विजयाची हॅट्ट्रिक साधण्याची चेन्नईला संधी आहे.
Chennai Super Kings
Chennai Super KingsSakal

IPL 2024, DC vs CSK: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 13 वा सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात रंगणार आहे. विशाखाट्टणमला होणारा हा सामना दोन्ही संघांचा या हंगामातील तिसरा सामना आहे.

संध्याकाळी 7.30 वाजता चालू होणाऱ्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स सलग दोन सामन्यांतील विजयांसह मैदानात उतरणार आहे, तर दिल्लीला मात्र पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. या सामन्यात चेन्नई पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात खेळताना दिसणार आहे.

विशाखापट्टणम हे दिल्लीचे या सामन्यासाठी घरचे मैदान आहे. दरम्यान, रविवारी होणाऱ्या सामन्यातही चेन्नईला विजयाचा प्रबळ दावेदार समजले जात आहे. यामागची महत्त्वाची कारणे जाणून घेऊ.

1. तगडी फलंदाजी

चेन्नई सुपर किंग्स संघाची ताकद ही त्यांचा संघातील समतोलपणा आहे. चेन्नईकडे फलंदाजीत सखोलता आहे. हीच गोष्ट त्यांच्यासाठी पहिल्या दोन्ही सामन्यात जमेची बाजू ठरली आहे. चेन्नईला रचिन रविंद्र आणि ऋतुराज गायकवाडकडून चांगली सुरुवात मिळत आहे.

मधल्या फळीत अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेलसह आक्रमक फलंदाजी करणारा शिवम दुबे आहे. इतकेच नाही तर त्यानंतर समीर रिझवी, रविंद्र जडेजा आणि एमएस धोनी हे फलंदाजीसाठी पर्याय असून दीपक चाहरही काहीप्रमाणात फलंदाजी करू शकतो. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना अधिक मेहनत घ्यावी लागते.

या तुलनेत दिल्ली कॅपिटल्सकडे फलंदाजीत सातत्य दिसलेले नाही. दरम्यान, या सामन्यात ते फलंदाजीतील ताकद वाढवण्याच्या दृष्टीने पृथ्वी शॉ याला संधी देऊ शकतात.

तरी चेन्नईची फलंदाजी पाहाता दिल्ली कॅपिटल्सकडून डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत अशा फलंदाजांना मोठ्या धावा करण्याचे आव्हान असणार आहे. कारण मोठ्या धावा झाल्या, तर चेन्नई संघ दबावात येऊ शकतो.

Chennai Super Kings
IPL 2024: अबब, तब्बल 155.8kph स्पीडचा बॉल! ज्याच्या वेगानं उडवली पंजाबची भंबेरी, तो कोण आहे मयंक यादव?

2. अष्टपैलू आणि गोलंदाजांचे पर्याय

गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले, तर दिल्लीकडे मिचेल मार्श, कुलदीप यादव, एन्रिच नॉर्किया, खलील अहमद, मुकेश कुमार, अक्षर पटेल यांचे पर्याय आहेत. मात्र अद्याप दिल्लीच्या गोलंदाजांना हवी तशी लय सापडलेली नाही.

मात्र स्विंगला मदत करू शकणाऱ्या विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर दिल्लीचे वेगवान गोलंदाज चेन्नईच्या फलंदाजांना आव्हान देऊ शकतात.

परंतु, गोलंदाजीतही तुलना करायची झाल्यास चेन्नईकडे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजीत दीपक चाहर, मुस्तफिजूर रेहमान, मथिशा पाथिराना असे पर्याय तर आहेतच, पण तुषार देशपांडे हा देखील मध्यमगती गोलंदाज एक चांगला पर्याय आहे.

इतकेच नाही, तर चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराजकडे रविंद्र जडेजा, डॅरिल मिचेल आणि रचिन रविंद्र हे फिरकी गोलंदाजी करू शकणारे अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. त्यातही फिरकी गोलंदाजीची मदार जडेजावर अधिक असणार आहे. एकूणच चेन्नईची गोलंदाजीतीलही सखोलता पाहाता दिल्लीच्या फलंदाजांचा कस लागू शकतो.

3. अनुभव आणि युवा खेळाडूंचे मिश्रण

चेन्नई संघाची यंदा आणखी एक जमेची बाजू म्हणजे संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचेही चांगले मिश्रण पाहायला मिळाले आहे. माजी कर्णधार एमएस धोनीसारखा १७ आयपीएल हंगामांचा अनुभव असणारा खेळाडू तर संघात आहेच, याशिवाय जडेजा, रहाणे, चाहर, मुस्तफिजूर हे अनुभवी खेळाडूही आहेत.

त्याचबरोबर युवा कर्णधार ऋतुराजसह संघात रचिन रविंद्र, समीर रिझवी, पाथिराना असे पंचवीशीच्या आतील खेळाडूही संघात आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व खेळाडू चांगल्या लयीत असल्याने संघात अनुभवी आणि नव्या दमाच्या खेळाडूंच्या उर्जेचा समतोलपणा साधला जात आहे.

याबाबत दिल्लीकडे मात्र समतोलतेची कमतरता जाणवते. कर्णधार रिषभ पंतने नुकेतच १४ महिन्यांनी पुनरागमन केले आहे, तर चांगल्या लयीत असलेल्या वॉर्नरला अद्याप कोणाची दमदार साथ मिळालेली नाही. मिचेल मार्शनेही अद्याप फारशी चांगली कामगिरी केलेली नाही.

त्यामुळे दिल्लीला एकूणच चेन्नई संघातील समतोलताच या सामन्यात भारी पडण्याची शक्यता आहे.

Chennai Super Kings
IPL सामन्यावरून तुंबळ हाणामारी; कोल्हापुरातील जखमीचा मृत्यू, रोहित शर्मा आऊट होताच केली होती मस्करी

4. आमने-सामने आकडेवारी

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघ आत्तापर्यंत 29 वेळा आमने-सामने आले असून 19 वेळा चेन्नईने बाजी मारली आहे, तर 10 वेळा दिल्लीने विजय मिळवला आहे. तसेच गेल्या चार सामन्यात चेन्नईनेच विजय मिळवला आहे. तसेच विशाखापट्टणमला या दोन संघात एक सामना झाला असून त्यात चेन्नईने विजय मिळवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com