IPL2020 मुंबई-दिल्ली अंतिम मुकाबला; हैदराबादची स्वप्नवत वाटचाल अखेर संपुष्टात

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन
Sunday, 8 November 2020

Indian Premier League 2020 Qualifier 2 : अबुधाबीच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात फायनलमध्ये धडक मारण्याची चुरस रंगली होती.   मार्कस स्टॉयनिसच्या अष्टपैलू खेळामुळे दिल्लीने अखेर पराभवाच्या नैराशेतून स्वतःला बाहेर काढले आणि हैदराबादची स्वप्नवद वाटचाल रोखत 17 धावांच्या विजयासह आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आता मंगळवारी मुंबई-दिल्ली असा विजेतेपदाचा सामना होईल. 

सलग पाच सामने जिंकून हैदराबादने कमाल दाखवली होती, पण आज मार्कस स्टॉयनिसने सलामीला येत 38 धावा केल्या आणि गोलंदाजीत तीन विकेट अशी कामगिरी केली. त्यात डोईजड जाणाऱ्या विलम्यमसनला बाद केले. दोन्ही संघातला तोच महत्वाचा फरक ठरला, अर्थात धवनच्या 78 धावा आणि रबाडाच्या चार विकेटही दिल्ली अंतिम फेरीत स्थान मिळवून देणाऱ्या ठरल्या. 

रबाडाने हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्याच षटकांत बाद करुन दिल्ली संघाला मोठा दिलासा दिला. दुसरा सलामीवीर प्रियम गर्ग आणि मनिष पांडे यांनी दडपण न घेता पहिल्या सहा षटकांचा फायदा घेत आक्रमक फलंदाजी केली, परंतु त्यात सातत्य ठेवता आले नाही. आशादायी चित्र निर्माण करुन ते बाद झाले. त्यानंतर केन विल्यसमन आणि जेसन होल्डर ही जोडी जम बसवत होती. 

अक्षर पटेलन होल्डरला बाद करुन हैदराबादची 4 बाद 90 अशी अवस्था केली तेव्हा सामना दिल्लीच्या हातात होता पण विल्यमसन 67 धावांची खेळी करुन हैदराबादचा किल्ला एकहाती लढवत होता 20 चेंडूत 43 धावांची गरज असताना तो बाद झाला आणि तेथेच सामन्याला निकाल बदलला. 

दिल्लीने आज पृथ्वॉ शॉला तर वगळलेच पण फलंदाजीच्या क्रमवारीतही अनपेक्षित बदल केले. फॉर्मात असलेल्या स्टॉयनिसला धवनसह सलामीला पाठवले त्यांची ही चाल चांगलीच यशस्वी ठरली. मुंबईविरुद्धच्या सामन्यात शुन्यावर बाद झालेल्या धवनला आज चांगली लय सापडली तर सुरुवातीच्या जीवदानानंतर स्टॉयनिसचा बॅट आक्रमक झाली. या दोघांनी 8 षटकांत 86 धावांची सलामी दिली तेव्हा दिल्ली द्विशतकी मजल मारणार असे चित्र होते. 

स्टॉयनिस बाद झाला आणि त्यानंतर दिल्लीच्या वेगवान गाडीला काहीसे ब्रेक लागले. एकीकडे धवन 50 चेंडूत 78 धावांची खेळी सजवत होता दुसऱ्या बाजुला रिषभ पंतऐवजी चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेल्या हेटमायरने 42 धावा केल्या, परंतु अखेरच्या षटकांत नटराजनने केलेल्या अचुक गोलंदाजीमुळे दिल्लीची धावसंख्या 189 पर्यंत मर्यादित राहिली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ipl2020 DCvsSRH Qualifier 2 Live Cricket Score Record Final Result