इटलीचा सलग अकराव्या सामन्यात विजय

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

इटलीने सलग अकराव्या आंतरराष्ट्रीय लढतीत विजय मिळवला. त्यांनी युरो पात्रता फुटबॉलमधील आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता करताना आर्मेनियाचा 9-1 धुव्वा उडवला. दरम्यान, स्पेनने युरो पात्रतेतील अखेरच्या लढतीत रुमानियाविरुद्ध पाच गोल केले.

लंडन : इटलीने सलग अकराव्या आंतरराष्ट्रीय लढतीत विजय मिळवला. त्यांनी युरो पात्रता फुटबॉलमधील आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता करताना आर्मेनियाचा 9-1 धुव्वा उडवला. दरम्यान, स्पेनने युरो पात्रतेतील अखेरच्या लढतीत रुमानियाविरुद्ध पाच गोल केले.

इटलीने पात्रता स्पर्धेतील सर्व दहा सामन्यात विजय मिळवला. या स्पर्धेपूर्वीच्या आंतरराष्ट्रीय सराव सामन्यात त्यांनी अमेरिकेला हरवले होते. त्यामुळे त्यांनी सलग अकरा लढती जिंकल्या आहेत. इटलीने हे त्यांच्या 109 वर्षांच्या फुटबॉल इतिहासात प्रथमच साधले आहे. निकोलो झानिओलो, सिरो इमोबाईल यांनी प्रत्येकी दोन गोल करीत इटलीस विजय सुकर करण्यास साह्य केले.

अव्वल संघ घडत आहे. संघातील नवोदितांची कामगिरी प्रत्येक सामन्यागणिक उंचावत आहे. संघातील प्रत्येकजण आपली उपयुक्तता सातत्याने दाखवत आहे. अंतिम स्पर्धेसाठी संघनिवड करताना कस लागणार आहे, असे इटलीचे मार्गदर्शक रॉबर्टो मॅन्सीनी यांनी सांगितले.

स्पेन अखेरच्या सामन्यात पाच गोल नोंदवत असताना सध्याचे मार्गदर्शक रॉबर्ट मॉरेनो यांच्याऐवजी लुईस एन्रिक यांच्याकडे पुन्हा सूत्रे दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मॉरेनो हेच पदावर राहण्यास उत्सुक नसल्याचेही काहींचे मत आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेस ते अनुपस्थित राहिल्याने त्यांनी संघाचा निरोप घेतल्याच्या चर्चेस जास्तच उधाण आले.

मेस्सीच्या भरपाई वेळेतील गोलने अर्जेंटिनास तारले
लिओनेल मेस्सीने भरपाई वेळेत केलेल्या गोलमुळे अर्जेंटिनाने उरुग्वेविरुद्धची लढत 2-2 बरोबरीत सोडवली. या लढतीचे वर्णन लुईस सुआरेझ वि. मेस्सी असेच केले जात होते. त्यात सुआरेझने गोल करीत तसेच अन्य एका गोलात मोलाची कामगिरी बजावत उरुग्वेला 2-1 आघाडीवर नेले होते. मात्र, भरपाई वेळेत उरुग्वे बचावपटूच्या हाताला चेंडू लागला. प्राप्त पेनल्टी किक मेस्सीने सत्कारणी लावली.
इस्राईलमधील या लढतीचे महत्त्व वेगळे होते. या वर्षाच्या सुरुवातीस पॅलेस्टाईन पाठीराख्यांनी अर्जेंटिनाची लढत रद्द करणे भाग पाडले होते, पण यावेळची लढत कोणताही अडथळा न येता सुरळीतपणे पार पडली. लढतीपूर्वी काही दिवस गाझा पट्टीत संघर्ष सुरू झाल्याने आपल्याला चिंता वाटत असल्याचे उरुग्वे मार्गदर्शक ऑस्कर तॅबारेझ यांनी सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: italy record 11 win in a row